लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पुणे-मुंंबई महामार्गावर नाशिक फाटा, कासारवाडी येथे सकाळी सातच्या सुमारास मिनी बसला ट्रेलरची धडक बसून झालेल्या अपघातात बसचालक ठार झाला. भोसरी पोलिसांकडे याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव इंद्रजीत शांताराम पांढरकर (वय ३०, रा. गंगानगर, पांढरकर चाळ) असे आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रजीत पांढरकर हे मिनी बस घेऊन जात असताना पुढे जात असलेल्या ट्रेलरला मागून धडकले. अपघातात पांढरकर गंभीर जखमी झाले. ही घटना नाशिक फाटा-कासारवाडी येथे घडली. ट्रेलर आणि मिनी बस अपघातस्थळी थांबल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. वाहतूक पोलिसांनी अपघात स्थळावरील वाहने हटविली. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. इंद्रजीत यांचा मृतदेह महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला. नंतर त्यांच्या नातेवाइकांकडे सुपूर्त करण्यात आला.
ट्रेलरला मिनी बसची धडक; एक ठार
By admin | Published: May 10, 2017 4:12 AM