पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या गुन्हेगारी घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग अधिक असल्याचे दिसून येत आहे. दुचाकी तसेच मोबाईल चोरट्यांची टोळी जेव्हा पकडली जाते, त्या वेळी त्यात दोन ते तीन आरोपी अल्पवयीन असतात. काही वेळा तर अल्पवयीन आरोपींची संख्या अधिक असते. अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारी घटनांमध्ये वाढता सहभाग असल्याने नागरिक चिंता व्यक्त करीत आहेत. चिंचवड पोलिसांनी नुकत्याच केलेल्या कारवाईत दुचाकी व मोबाईल पळविणारे आठ आरोपी पकडले. त्यातील पाच आरोपी अल्पवयीन होते. तत्पूर्वी पिंपरी, भोसरी आणि अन्य परिसरात घडलेल्या गुन्हेगारी घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग दिसून आला आहे. केवळ चोरीच्या गुन्ह्यातच नाही तर खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातही अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढल्याचे निदर्शनास आले आहे. वर्षभरातील गुन्हेगारी घटनांचा आढावा घेतल्यास अशा घटनांमध्ये अल्पवयीन आरोपींचा सहभाग असल्याचे निदर्शनास येते. कधी मौज मजेसाठी मोबाईल, दुचाकी चोरीचा मार्ग मुले अवलंबतात. गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित व्यक्तींच्या संपर्कात आल्यानंतर गुन्हेगार अशा अल्पवयीन मुलांचा खुबीने वापर करून घेतात. त्यामुळे शहरात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. शाळेत जाण्याच्या वयात काही ना काही कारणास्तव ज्यांना शाळा सोडण्याची वेळ आली. कमी वयात पैसे मिळण्याचा मार्ग मिळाला. पैसे मिळविण्याचा मार्ग चांगला की वाईट हे समजण्याच्या वयात पदार्पण करण्यापूर्वीच त्यांना कुसंगत लाभल्याने त्यांचा गुन्हेगारी क्षेत्रात शिरकाव झाला आहे.(प्रतिनिधी)
गुन्हेगारीत अल्पवयीन मुले
By admin | Published: April 27, 2017 5:01 AM