तळवडे - सध्या मार्केटिंगचे युग आहे. प्रत्येकजण आपापले ‘प्रॉडक्ट’ विकण्यासाठी नवनवीन पद्धतींचा अवलंब करीत आहे. शहर परिसरात काही ‘पॉलिसी’ विक्रीसाठी, तसेच विविध कोर्सची माहिती देऊन मार्केटिंग करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांकडून मिळविलेल्या माहितीचा गैरवापर होत आहे. त्यामुळे पालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. काही सामाजिक संस्थांकडून शाळा, महाविद्यालयात विविध स्पर्धा राबविल्या जातात. यामध्ये चित्रकला, निबंधलेखन, सामान्य ज्ञान यांसारख्या परीक्षांचे आयोजन केले जाते. त्यासाठी शुल्क आकारले जात नसल्यामुळे सर्वच विद्यार्थी सहभागी होत असतात. परंतु अशा परीक्षा घेताना विद्यार्थ्याचे नाव, इयत्ता, तुकडी, पत्ता आणि पालकांचा संपर्क क्रमांक अशा स्वरूपाच्या माहितीचे संकलन केले जाते. काही कालावधीनंतर पालकांना आपल्या पाल्याने आम्ही घेतलेल्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे. त्याचे गुणपत्रक, प्रमाणपत्र, बक्षीस घेण्यासाठी अमुक पत्त्यावर यावे, तसेच येताना पती आणि पत्नी दोघांनाही येणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. पालक ही सर्व माहिती ऐकून सांगितलेल्या ठिकाणी जातात. तेथे गेल्यावर बरेचसे लोक आलेले असतात. तुमचा पाल्य खूप हुशार आहे. त्याने आम्ही घेतलेल्या परीक्षेत छान गुण मिळविले असून, त्याबद्दल त्याला पारितोषिक देत आहोत. त्याची अमुक रकमेची ‘पॉलिसी’ आम्ही काढत आहोत. त्याचे नियमित हप्ते भरल्यावर वयाच्या वीस, एकविसाव्या वर्षी ठरावीक रक्कम मिळेल. भविष्यात तुमच्या पाल्याच्या शिक्षणासाठी त्याचा उपयोग होईल, असे सांगण्यात येते. संबंधित ‘पॉलिसी’चे हप्ते भरण्याची गळ पालकांना घातली जाते.पालकांनी सतर्क राहण्याची गरजपालकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. शाळा आणि महाविद्यालयात घेतलेल्या स्पर्धा व शासकीय परीक्षा यांची गुणपत्रके, प्रमाणपत्र आणि बक्षिसे यांचे वाटप हे त्याच ठिकाणी केले जाते. त्यामुळे अशा प्रकारच्या फोनवर विश्वास ठेवून तेथे जाऊ नये, असे आवाहन शाळा आणि महाविद्यालयांतर्फे करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांच्या माहितीचा गैरवापर, मार्केटिंगचा नवा फंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 3:41 AM