पिंपरी :पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ परिसरातील अंगणवाडी सेविकांनी मंगळवारी (दि.२३) पिंपरी चिंचवड शहरातील भोसरीचे आमदार महेश लांडगे, पिंपरीचे अण्णा बनसोडे, चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांच्यासह मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या कार्यालयासमोर विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी ठिय्या आंदोलन केले. यावेळी 'आमदार तुपाशी, अंगणवाडीताई उपाशी' अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत राज्य शासनाकडून नेमण्यात आलेला अंगणवाडी सेविकांचे अनेक प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहेत. यासाठी या महिलांनी वेळोवेळी आंदोलनाचा पवित्रा घेतला असूनही त्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत. अंगणवाडी सेविकांना मानधन नको, पगार द्या, ग्रॅच्युईटी द्या, घरभाडेभत्ता वाढवून द्या, निवृत्तीवेतन द्या, या चार प्रमुख मागण्यांसाठी ४ डिसेंबरपासून या सेविकांचे आंदोलन सुरू आहे. ५१ दिवस झाले तरी शासनाने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष न दिल्याने आता या सेविकांनी जागोजागी आमदारांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरातील तिन्ही आमदारांसह मावळच्या आमदारांच्या कार्यालयासमोर आंदोलनाची सुरुवात करण्यात आली.
गेले ५१ दिवस आंदोलन सुरू असतानाही शासनाला त्याची दखल घ्यावीशी वाटलेली नाही. त्यामुळे आम्ही आता आमदारांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. आमदारांचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन आहे. आठ दिवसात आमची दखल घेतली गेली नाही तर आंदोलन तीव्र करण्यात येईल.
- शैलजा चौधरी, अंगणवाडी सेविका