चाकण : मागील वीस वर्षांपासून चाकणच्यावाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत चालला आहे. कोंडी हटवण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत; मात्र त्याही तोकड्या पडल्याने वैतागलेल्या चाकणकर नागरिकांनी लोकप्रतिनिधींना धारेवर धरले आहे. खासदार-आमदार साहेब आता तरी चाकणची कोंडी सोडवा ओ अशी मागणी केली आहे.चाकणची वाहतूक कोंडी कोण सोडवणार ? हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरितच आहे. नेत्यांच्या कामांच्या घोषणा झाल्या आणि आश्वासने झाली; परंतु प्रत्यक्षात काहीच काम होत नाही. निवडणुका आल्या आणि गेल्या;परंतु चाकणकर नागरिक वाहतूक कोंडीत अडकले आहेत. वाहतूक कोंडीत दररोज चाकणकर नागरिक, उद्योजक, कामगार, विद्यार्थी व शेतकरी भरडला जात आहे. रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकल्याने रुग्णांना उपचारात प्रचंड अडथळे येत आहेत. या मार्गाने ये-जा करणाऱ्या राज्यातील तसेच जिल्ह्यातील नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीशी सामना करावा लागत आहे; परंतु वाहतूक कोंडी काही केल्या सुटत नाही. या मार्गावरून प्रवास करताना वाहतूक कोंडी झाली आहे का ? यासाठी पहिला गुगल मॅप चेक करून जावे लागत आहे. त्यामुळे चाकणमधील प्रवास नकोसा वाटत आहे.वाहतूक कोंडीचा सर्वांत मोठा फटका चाकण औद्योगिक वसाहतीतील कामगार व कंपन्यांना बसत आहे. चाकण - शिक्रापूर परिसरात मोठ्या प्रमाणात कंपन्या आहेत. त्यामुळे या भागात सातत्याने वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणात सुरू असते. त्याचबरोबर कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे.कोट्यवधी रुपयांचा निधी राज्य शासनाला मिळत असतानाही या भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न अजूनही सुटला नाही.यामुळे याचा मोठा फटका औद्योगिक क्षेत्राला बसत असल्याने कंपन्या-उद्योग दुसरीकडे स्थलांतरित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.विस्तारीकरणाचे काम संथगतीने सुरूचाकणच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.सध्या पुणे-नाशिक महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे; मात्र रस्त्यालगत असलेले विद्युत खांब व रोहित्र यामुळे विस्तारीकरणाला अडथळा निर्माण होत आहे.या मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतरच या भागातील वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होऊ शकते.पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण येथील तळेगाव चौक व आंबेठाण चौक या दोन्ही चौकांमध्ये उंचावरील स्काय वाक ( पादचारी फुल ) उभारणे आवश्यक आहे. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.
आमदार-खासदार साहेब आता तरी कोंडी सोडवा ओ..! २० वर्षांपासून चाकणकर करताहेत मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 18:58 IST