पिंपरी : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या प्रवेशद्वारावर शुक्रवारी (दि. १२) भरदुपारी दोनच्या सुमारास जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर चार जणांनी कोयत्याने वार करत गोळीबार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आवारे यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आवारे यांच्या आईने ही हत्या राजकीय वैमनस्यातून केली असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांच्या आईने आई सुलोचना आवारे यांनी दिलेल्या फिर्यादित आमदार सुनील शेळके, सुधाकर शेळके, संदीप गराडे, शाम निगरडकर यांच्यावर आरोप केला आहे. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आवारे हे शुक्रवारी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आले होते. मुख्याधिकाऱ्यांसोबतची बैठक झाल्यानंतर ते पावणेदोनच्या सुमारास नगर परिषदेच्या प्रवेशद्वारावर आले. त्यावेळी नगर परिषदेच्या इमारतीच्या मागे दबा धरून बसलेल्या आरोपींनी आवारे यांच्या डोक्यात कोयत्याने वार केले तसेच बंदुकीतून गोळीबार केला.
हत्येनंतर आरोपी तेथे काही क्षण थांबले. त्यानंतर तेथून पळ काढत रस्त्यावरील दुचाकीस्वारांना बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याकडील दुचाकी हिसकावून पळ काढला. आवारे यांना लगेच एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांना मृतघोषित करण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.
भय इथले संपत नाही...
आवारे यांची हत्या भरदिवसा नगर परिषदेच्या आवारात अगदी गर्दीच्या ठिकाणीच झाली. नगर परिषदेपासून अगदी हाकेच्या अंतरावर मारुती चौक आहे. हा चौक नेहमीच माणसांनी गजबजलेला असतो. बँक तसेच महत्त्वाची दुकाने याच चौकात आहेत. गोळीबाराने आणि हत्येची माहिती मिळताच इथे एकच घबराट पसरली. दुकानदारांनी आहे त्या स्थितीत आपली दुकाने बंद केली. दुकानाच्या बाहेरील माल तसाच ठेवून तातडीने दुकाने बंद केली. हजारो रुपयांचा माल दुकानाबाहेर असतानाही दिवसभर दुकानमालक पुन्हा त्याठिकाणी फिरकले सुद्धा नाहीत. दिवसभर येथील व्यापारी व नागरिक भीतीच्या सावटाखाली होते.