पिंपरी- चिंचवड शहरातील भाजपाचे जेष्ठ नेते, माजी शहराध्यक्ष आणि विद्यमान आमदार लक्ष्मण पाडुरंग जगताप (वय ५९) यांचे बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले. पिंपळे गुरव येथील जगताप कुटुंबियांच्या शेतात आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. भजन करीत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. जगताप यांच्या निधनाने शहरावर शोककळा पसरली.
राजकारण, समाजकारण, शिक्षण, सहकार, व्यापार, कला, उद्योग या क्षेत्रात आपल्या दैदीप्यमान कर्तृत्वाने स्वतःचे अढळ स्थान निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे चिंचवडचे आमदार लक्ष्मण पांडूरंग जगताप हे होत. महानगरपालिका, विधान परिषद अशा विविध माध्यमांतून रचनात्मक कार्य करून स्वतःची भाऊ अशी ओळख निर्माण केली होती. ३५ हून अधिक वर्षांमध्ये त्यांनी केलेल्या विकासकामांकडे लक्ष वेधल्यास हे व्यक्तिमत्त्व किती कृतिशील आहे, याचे दर्शन घडते.
मनसे पक्षाने देखील लक्ष्मण जगताप यांना श्रद्धाजंली वाहिली आहे. तसेच राज ठाकरेंच्या २०१४ मधील सभेचा एक व्हिडिओही मनसेने ट्विटरवरुन शेअर केला आहे. राजकीय पक्ष प्रवाही असतो, ह्या प्रवाहाचाही अनेक प्रवाहांशी संबंध येतो. कधी ते सर्व प्रवाह एकरूप होतात तर कधी मार्ग वेगळे होतात. लक्ष्मण जगताप २०१४ च्या लोकसभा निवडणुकीला शेतकरी कामगार पक्ष - महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्या युतीचे उमेदवार होते... राजकीय प्रवासातील ही एक विशेष आठवण, असं मनसेनं म्हटलं आहे. तसेच या व्हिडिओमध्ये 'आजची गर्दी पाहता लक्ष्मणराव तुम्ही निवडून आलात...', असा विश्वास राज ठाकरेंनी व्यक्त केला होता.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने लक्ष्मणराव जगताप यांनी शेकापमध्ये प्रवेश केला होता. पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर काही महिन्यांतच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपकडून उभे राहिले होते. या निवडणुकीत लक्ष्मण जगताप विजयी होऊन विधानसभेत निवडून गेले होते.
दरम्यान, पिंपळेगुरवच्या शेतकरी कुटुंबात लक्ष्मण यांचा जन्म झाला. १९८२ मध्ये युवक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून काम करीत असताना तत्कालीन विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्त्वाचा प्रभाव त्यांच्यावर पडला. पवार यांनी १९८४ मध्ये एस काँग्रेसच्या माध्यमातून लोकसभा निवडणूक लढविली. त्या वेळी पवार यांच्या प्रचारात लक्ष्मण जगताप सहभागी झाले होते. पुढे १९८६ मध्ये नगरसेवक झाले. त्यानंतर १९९१ मध्ये अजित पवार बारामती लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहिले. त्या वेळीही दादांचा प्रचार लक्ष्मण यांनी केला.
नगरसेवक पदाच्या काळात पिंपळे गुरव ते दापोडी व पिंपळे गुरव ते कासारवाडी हे पूल जोडण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे १९९२ ते ९७ या काळात दुसऱ्यांदा निवडून आले. स्थायी समितीचे अध्यक्षही झाले. त्यानंतर १९९७ ते २००२ या कालावधीत तिसऱ्यांदा संधी मिळाली. २००२ मध्ये महापौरपदही मिळाले. महापौर पदही गाजविले. पुढे २००२ ते २००७ या कालावधीत चौथ्यांदा नगरसेवकपद मिळाले. याच कालावधीत राष्ट्रवादीचे शहराध्यक्षपदीही मिळाले. त्यांनी पक्ष - संघटना मजबूत केली.
पुढे २००४ मध्ये विधान परिषदेवर आमदार झाले. त्यानंतर २००९ मध्ये चिंचवडमधून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर २०१४ मध्ये अपक्ष म्हणून खासदारकी लढविली. मात्र, अपयश आल्याने भाजपातून आमदारकी लढवून आमदार झाले. त्यानंतर भाजपाचे शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी घेऊन २०१७ मध्ये महापालिकेत भाजपाची एकमुखी सत्ता आणली. त्यानंतर शहराचे नेतृत्व म्हणून कार्यरत होते. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खंदे समर्थक म्हणूनही त्यांनी लौकीक मिळविला. २०१९ च्या निवडणूकीतही चिंचवडमधून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक आले.