पिंपरी : आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व ३२ जागा लढविणार आहे. उमेदवारी देताना तरुण मुला-मुलींना संधी दिली जाईल, असे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केले. यासह अनधिकृत बांधकामांना मनसेने कधीही पाठीशी घातलेले नाही आणि घालणारही नाही, असेही त्यांनी शनिवारी पिंपरी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. ते म्हणाले, मनसेच्या नेत्यांकडून आतापर्यंत पिंपरी-चिंचवडकडे दुर्लक्ष झाले. पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकाही रखडल्या होत्या. मात्र, यापुढे असे होणार नाही. मेळावे घेऊन कार्यकर्त्यांना ताकत दिली जाईल. आगामी महापालिका निवडणुकीत सर्वच ३२ प्रभागांत उमेदवार उभे केले जातील. यामध्ये तरुणांना संधी दिली जाईल. तरुणांना प्रतिनिधित्वची संधी देण्याचा अजेंडा आहे. यासह अनधिकृत बांधकामांना मनसे कधीही पाठीशी घालणार नाही. अशा बांधकामांना सामान्य नागरिक जबाबदार नसून, ज्यांनी घरं बांधून दिली, ते बिल्डर जबाबदार आहेत. आयुष्यभराची पुंजी जमा करून घर घेतलेल्या सामान्य नागरिकांऐवजी ज्यांनी ही घरे उभारली, अशा बांधकाम व्यावसायिकांवर फौजदारी कारवाई व्हायला हवी. यामध्ये सामान्यांची चुकी नाही. अशा बांधकाम बांधून देणाऱ्यांवर सरकारने आतापर्यंत काय कारवाई केली, असा सवाल नांदगावकर यांनी उपस्थितकेला. सध्या राज्यातील भाजपा, शिवसेना एकमेकांवर आरोप करीत आहेत. मात्र, त्यांच्यात ‘आम्ही दोघे भाऊ भाऊ दोघे मिळून खाऊ’, अशी स्थिती पाहायला मिळत आहे. तर काँगे्रस-राष्ट्रवादीचीही अशीच स्थिती होती. सध्या युती, आघाडीमध्ये कबड्डी, कबड्डी सुरू असल्याची टीका नांदगावकर यांनी केली. (प्रतिनिधी)
अनधिकृत बांधकामांना मनसेचा विरोध कायम
By admin | Published: October 16, 2016 3:55 AM