पिंपरी : धुडगूस घालत टोळक्याने दगडफेक करून तलवार कोयता यासारख्या हत्यारांनी वाहनांची तोडफोड केली. तसेच एकावर हल्ला करून दहशत निर्माण केली. पिंपरीतील नेहरूनगर येथे शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी १०० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आशिष जगधने (वय ३१), इरफान शेख (वय ३०), जितेश मंजुळे (वय २८), जावेद औटी (वय २९), आकाश हजारे (वय ३०) तसेच इतर ९५ साथीदार यांच्याविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. नीलेश सुभाष जाधव (वय ३५, रा. नेहरू नगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी हे त्यांच्याकडील लॅपटॉप त्यांच्या चारचाकी वाहनात ठेवायला गेले असताना आरोपी चारचाकी वाहनातून तसेच दुचाकीवरून तेथे आले. त्यांच्याकडे तलवारी, कोयते, लाकडी दांडकी, बॅट, चॉपर, सिमेंटचे ब्लॉक व वीटा होत्या. हा होता का, अरे याला आता आपण जिवंत सोडायचे नाही, याला संपवून टाकू, असे म्हणून आरोपी यांनी फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला. दम असेल तर बाहेर या, असे म्हणत आरोपी यांनी आरडाओरडा करून दहशत निर्माण केली. त्यामुळे कोणीही फिर्यादी यांच्या मदतीला आले नाही. लोक तेथून सैरावैरा पळून गेले. स्थानिक लोकांनी आपापली दुकाने बंद करून घेतली. आरोपींनी तेथे पार्क केलेल्या दुचाकी व चारचाकी यासह इतर गाड्या फोडून नुकसान केले.
---------
पोलीस आयुक्तांची घटनास्थळी भेट चिंचवड येथील वाहन तोडफोडीची घटना ताजी असतानाच पिंपरीत असाच प्रकार घडला. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी याची गंभीर दखल घेतली असून घटनास्थळाला भेट दिली. याप्रकरणी जलद तपास करून आरोपींना त्वरित अटक करून कारवाईबाबत त्यांनी सूचना दिल्या आहेत.