पिंपरी : गुन्हेगारी टोळी करून वर्चस्व व आर्थिक फायद्यासाठी विविध प्रकारचे १८ संघटीत गुन्हे करणाऱ्या पांग्या जाधव व आक्या बॉन्ड टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियत सन १९९९ (मोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली. सहा जणांच्या या टोळीत दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. टोळी प्रमुख विकास ऊर्फ पांग्या धोंडीराम जाधव (वय २२, रा. शरदनगर, चिखली), आकाश ऊर्फ सुमित ऊर्फ आक्या बॉन्ड पांडुरंग मोहोळ (वय १९, रा. घरकुल, चिखली), शोएब इजराईल शेख (वय १९, रा. घरकुल, चिखली), विशाल रामधन खरात (वय २०, रा. ओटास्किम, निगडी) यांच्यासह अन्य दोन अल्पवयीन आरोपींवर पोलिसांनी मोकाची कारवाई केली.आरोपी यांनी टोळी करून वर्चस्वासाठी विविध प्रकारचे गुन्हे केले. तसेच आर्थिक फायद्यासाठी देखील गुन्हेगारी कृत्य केले. घरकूल व चिखली परिसरात त्यांच्याकडून दहशत पसरविण्यात येत होती. त्यामुळे त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्याचे चिखलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी सांगितले.पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईबाबतचा प्रस्ताव तयार केला. पोलीस निरीक्षक राजकुमार शिंदे यांनी प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता केली. त्यानंतर सोमवारी (दि. १०) अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी हा प्रस्ताव मंजूर करून त्याबाबतचा आदेश पारीत केला. पोलीस कर्मचारी सचिन चव्हाण व दत्ता कदम यांनी प्रस्ताव तयार करण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी केली.
गुन्हेगारी टोळी करून वर्चस्व व आर्थिक फायद्यासाठी तब्बल १८ गुन्हे करणाऱ्यांवर मोकाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 12:03 PM
आरोपी यांनी टोळी करून वर्चस्वासाठी विविध प्रकारचे केले गुन्हे तसेच घरकुल व चिखली परिसरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न.
ठळक मुद्देपांग्या जाधव, आक्या बॉन्ड टोळीवर मोकाची कारवाई; दोन अल्पवयीन जणांचा समावेश