पिंपरी : विमानाने हरियाणातून येऊन स्थानिक तरुणांच्या मदतीने पिंपरी-चिंचवड शहरातील एटीएम फोडणाºया टोळीला बेड्या ठोकण्यात यश आले आहे. आरोपींकडून शहरातील एटीएम फोडीचे आठ गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून २० लाख २० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. वाकड पोलीस वेशांतर करून हरियाणा येथे दहा दिवस तळ ठोकून होते. कसून शोध घेत त्यांनी आरोपींना जेरबंद केले. अझरुद्दीन ताहीर हसेन (वय २९, रा. टोंका, पलवन, हरियाणा), सर्फुद्दीन हसीम (वय २२, रा. हरियाणा), मोहमद शाकिर हसन मोहमद (वय ३५, रा. हरियाणा), संदीप माणिक साळवे (वय ४३, रा. जांभे, ता. मुळशी, पुणे), दत्तात्रय रघुनाथ कोकाटे (वय ४२, रा. थेरगाव, पुणे), गौतम किसन जाधव (वय ३८, रा. थेरगाव, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथे २७ जानेवारी आणि १२ फेब्रुवारी या पंधरा दिवसांच्या कालावधीत एटीएम फोडीच्या दोन घटना घडल्या होत्या. एटीएम फोडीतील दोन स्थानिक आरोपी थेरगाव फाटा येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच मुख्य आरोपी हरियाणा आणि बाहेरील राज्यातील असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार वाकड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने पथकासह हरियाणा येथे गेले. तेथे वेशांतर करून दहा दिवस थांबून आरोपींचा कसून शोध घेतला. आरोपींवर पाळत ठेवत पोलिसांनी त्यांना अटक केली. वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने, उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर, पोलीस कर्मचारी बापूसाहेब धुमाळ, विक्रम जगदाळे, प्रमोद कदम, प्रशांत गिलबिले, शाम बाबा, रमेश गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.शहरात सातत्याने एटीएम फोडीचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे या गुन्ह्यांची उकल करून असे प्रकार रोखण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. या तपासामुळे एका टोळीचा पर्दाफाश झाला आहे. वाकड पोलिसांच्या या तपासाला राज्यातील ‘बेस्ट डिटेक्शन’साठी सादर केले जाणार आहे. तसेच वाकड पोलिसांच्या तपास पथकाला ५० हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
कचºयाच्या डब्याची पाहणी करून ‘प्लॅन’बँकेच्या संबंधित एजन्सीकडून एटीएममध्ये रोकड भरली जाते. ही रोकड एका दोºयाने बांधून एका विशिष्ट पाकिटातून आणली जाते. एटीएममध्ये रोकड भरल्यानंतर त्याचा दोरा आणि पाकिट एटीएम सेंटरमधील कचºयाच्या डब्यात टाकले जाते. या कचºयाच्या डब्यांची पाहणी आरोपींकडून केली जायची. अशी पाकिटे व दोरा ज्या कचºयाच्या डब्यात असतील त्या एटीएममध्ये पैसे आहेत, असा अंदाज आरोपी घेत असत. त्यानंतर ते एटीएम फोडण्याचा त्यांच्याकडून प्लॅन केला जात असे.
गुन्ह्यात स्थानिकांची साथस्थानिक नागरिक सहज मदत करीत असल्याने हरियाणा येथील टोळीला पिंपरी- चिंचवड शहरात एटीएम फोडण्यासाठी सुरक्षित वातावरण होते. स्थानिक आरोपी चोरट्यांना गॅस कटर, गॅस, रस्त्यांची माहिती, शहरातील विविध ठिकाणांची माहिती पुरवत असत. त्यामुळे मुख्य आरोपी प्रथम शहरात यायचा. स्थानिक आरोपींच्या मदतीने एटीएम सेंटरची पाहणी करायचा. त्यानंतर टोळीतील इतर सदस्यांना हरियाणातून बोलवून घेत असे आणि एटीएम फोडून चोरी करीत असत.