पिंपरी : शहरातील दोन टोळ्यांवर गुन्हे शाखेने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यांतर्गत कारवाई केली. आर्थिक फायद्यासाठी टोळी बनवून दहशत पसरवल्याने या टोळ्यांवर कारवाई केल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी दिली.
निगडी ओटा परिसरात दहशत पसरवणाऱ्या वाले टोळीवर पोलिसांनी कारवाई केली आहे. टोळी प्रमुख अमोल बसवराज वाले (वय २३), मेघराज ऊर्फ राज संजय वाले (वय २५), आनंद बसवराज वाले (वय १९, सर्व रा. इंदिरानगर, ओटास्कीम, निगडी) यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली.
पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वर्चस्वासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी टोळी बनवून संघटित गुन्हे करणाऱ्या पाटील टोळीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. टोळी प्रमुख धर्मेश श्यामकांत पाटील (वय २५, रा. गोकुळधाम हाऊसिंग सोसायटी, पुणे), स्वप्नील संजय कांबळे (वय २८, रा. मोनिका अपार्टमेंट जवळ, आदर्शनगर, पिंपरी), सोनू विनोद पारचा (वय ३०, रा. तथागत हाऊसिंग सोसायटी, मिलिंदनगर, पिंपरी), रशीद इर्शाद सय्यद (वय २६, रा. बालमल चाळ, श्रमिक नगर, पिंपरी गाव) , राज दत्ता चौरे (रा. संतोष हाऊसिंग सोसायटी, मिलिंदनगर, पिंपरी) यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली. या टोळींवर मोका अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव गुन्हे शाखाने दिला होता. त्या नुसार अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी या टोळ्यांवर मोका कारवाई करण्याचा आदेश दिला.