पिंपरी : पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या चार सराईत गुन्हेगारांवर मोक्काअंतर्गत (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) कारवाई करण्यात आली. मोक्काची कारवाई झालेल्यांमध्ये एका अल्पवयीन आरोपीचाही समावेश आहे. पिंपरी, भोसरी, एमआयडीसी, विश्रांतवाडी, बंडगार्डन, निगडी, येरवडा आदी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या अमर ऊर्फ रिंकू कुलवंतसिंग चव्हाण (वय २६), दीपक थापा (वय २०), रहीम चौधरी (वय २०, सर्व रा. नेहरुनगर) यांच्यासह एक अल्पवयीन अशा चार जणांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मारहाण, हिंसाचार, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. अमरवर २४, दीपकवर ४ आणि रहीमवर ७ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पोलीस आयुक्त उत्तर प्रादेशिक विभागाने या कारवाईस संमती दिली आहे. पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी. मुदिराज यांनी सहायक पोलीस आयुक्त मोहन विधाते आणि परिमंडल तीनचे उपायुक्त बसवराज तेली यांच्यामार्फत मोक्काच्या कारवाईचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. अप्पर पोलीस आयुक्त उत्तर विभागाकडे प्रस्ताव सादर झाल्यानंतर या विभागाने पुढील कारवाई केली. यापूर्वी भोसरीतील गोट्या धावडे टोळी, नेहरुनगरमधील मनोज वीटकर टोळीतील गुन्हेगारांवर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)
चार सराईत गुन्हेगारांवर ‘मोक्का’
By admin | Published: August 28, 2015 4:21 AM