पिंपरी : टेलिकॉम डिपार्टमेंटमधील प्रतिनिधी आणि पोलिस असल्याचे भासवून एका महिलेच्या नावाने मनी लॉन्डरिंग झाल्याचे सांगत महिलेची १५ लाख २५ हजार रुपयांनी फसवणूक केली. ही घटना २ डिसेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत वाकड येथे घडली. याप्रकरणी ३४ वर्षीय महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एक अज्ञात व्यक्ती आणि पोलिस उपनिरीक्षक हेमराज कोळी असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी व्यक्तीने फिर्यादी महिलेला फोन करून ती टेलिकॉम डिपार्टमेंट ऑफ इंडियामधून बोलत असल्याचे खोटे सांगितले. फिर्यादी यांच्या नावाने सिम कार्ड खरेदी करून १५ ते २० लोकांना बेकायदेशीर मेसेज पाठवण्यात आले आहेत. तसेच त्या सिम कार्डचा वापर मनी लॉन्डरिंगसाठी केला आहे. त्याबाबत टिळकनगर पोलिस ठाणे, मुंबई आणि अंधेरी पोलिस ठाणे, मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगितले. पोलिस उपनिरीक्षक हेमराज कोळी असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीने फिर्यादी यांच्या खात्यावरून २५ कोटींचे व्यवहार झाले असल्याचे खोटे सांगितले. फिर्यादीकडून १५ लाख २५ हजार रुपये पाठवण्यास सांगून त्यांची फसवणूक केली. वाकड पोलिस तपास करीत आहेत.
ट्रेंडिंगच्या बहाण्याने तब्बल ७६ लाखांची फसवणूक
आयपीओ आणि ट्रेडिंग करण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची ७६ लाख ११ हजार ७०० रुपयांची फसवणूक केली. ही घटना १० नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ऑनलाइन माध्यमातून घडली. याप्रकरणी ४२ वर्षीय व्यक्तीने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राधाकृष्णन नायर, ऐश्वर्य शास्त्री जिओजित आणि इतर अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना व्हाॅट्सॲपवर मेसेज करून त्यांना एका ग्रुपमध्ये जॉईन होण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांना ब्लॉक ट्रेडिंग आणि आयपीओ खरेदी करण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांना एक लिंक पाठवून त्यावरील वेगवेगळे ट्रेडिंगचे व्हिडीओ पाहण्यास सांगितले. गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल, असे आमिष दाखवून व्यक्तीकडून ७६ लाख ११ हजार ७०० रुपये घेत व्यक्तीची फसवणूक केली.