-नारायण बडगुजर
पिंपरी : मुसळधार पावसात भिजावं, रस्त्यावरील डबक्यात उड्या माराव्यात आणि धम्माल करावी, असे मुलांना वाटते. शाळेतून घरी जाताना असा खोडकरपणा हमखास केला जातो. असा आनंद लुटण्याचा मोह सध्याच्या वातावरणामुळे अनावर होताना दिसून येतो. अतिवृष्टीमुळे शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे पालक मुलांसह पर्यटनाला किंवा खरेदीला बाहेर जाऊ शकतात. मात्र, सर्वत्र पाणीच पाणी झाले असून, रस्त्यांनाही नदी आणि तळ्यांचे स्वरुप आले असून अपघात व दुर्घटनेची शक्यता आहे. त्यामुळे सुटी असली तरी घराबाहेर पडू नका, असे आवाहन करण्यात येत आहे.
पुणे जिल्हा आणि पिंपरी -चिंचवड शहरात मुसळधार पाऊस होत आहे. तसेच आणखी ४८ तास अतिवृष्टीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्या अनुषंगाने शासनाने शाळांना सुटी जाहीर केली आहे. त्यामुळे मुलांसह त्यांच्या पालकांचा आनंद ओसंडून वाहत आहे. सुटीचा आनंद व्दिगुणीत करण्यासाठी काही पालकांकडून वर्षा विहार, पर्यटनाचे प्लॅनिंग केले जात आहे. मात्र, असे करणे धोक्याचे आहे. अतिवृष्टीच्या काळात घराबाहेर पडणे आततायीपणाचे ठरू शकते. मुलांसह स्वत:च्या सुरक्षेसाठी घरातच थांबणे आवश्यक आहे.
खबरदारीसाठी सुटी
पावसाचे पाणी रस्त्यावर साचते. त्यामुळे मुलांना शाळेत सोडताना पालकांना कसरत करावी लागते. तसेच झाडपडीच्या घटना घडतात. काही जुने वाडे, इमारती ढासळू शकतात. या सर्व बाबींचा विचार करून पालक आणि विद्यार्थी सुरक्षित रहावेत म्हणून आणि दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते. त्याचाच एक भाग म्हणून सुटी जाहीर करण्यात आली आहे.
पावसाच्या सरी, अनुभवा घरी
अतिवृष्टीमध्येही काही जणांना घराबाहेर पडावेसे वाटते. मात्र, घरात राहूनही पावसाचा आनंद घेता येतो. वर्तमान पत्र, बातम्यांमधून दुथडी वाहणाऱ्या नद्या, धबधबे याचा आनंद घेऊ शकतो.
...तर जीवावर बेतू शकते
अतिवृष्टीमध्ये घराबाहेर पडणे धोक्याचे आहे. धरण, बंधारे, नदी, तलाव, विहीर येथे पोहण्यासाठी जाणे जीवावर बेतू शकते. पाण्यात बुडून वाहून जाऊन काही जणांना जीव गमवावा लागत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे घराबाहेर पडणे टाळावे.
खरेदीही नको रे बाबा...
सुटीनिमित्त काही जण किराणा साहित्य तसेच कपडे, रेनकोट आदी खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडतात. अतिवृष्टीत खरेदीसाठी बाहेर पडणे टाळावे. पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. तसेच काही ठिकाणी गटार, चेंबर उघडे आहेत. त्यात पडून किंवा अडकून दुर्घटना घडू शकते.
‘हे’ नक्की करा...
सुटीमध्ये घरात थांबून मुलांना पावसाची गाणी, गोष्टी सांगा. ढग, पाऊस आणि ऋतू चक्र याबाबत मुलांना सोप्या भाषेत समजवा. पावसाळ्यात काय खबरदारी घ्यावी, याबाबत माहिती द्या.
पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. मुलांना पचनास हलके खाद्य पदार्थ द्यावेत. पावसात भिजू नये. कोरडे व स्वच्छ कपडे परिधान करावेत.- डॉ. यशवंत इंगळे, वायसीएम रुग्णालय, पिंपरी
पालकांनी घरातच थांबून मुलांकडून वाचन, लेखन यासह नियमित अभ्यास करवून घ्यावा. घरातच खेळता येतील असे खेळ खेळावेत. मुलांना हलक्या फुलक्या कथा, गोष्टी सांगाव्यात. मुलांना वेळ देण्याची यानिमित्त पालकांना संधी आहे.- शशिकांत हुले, शिक्षक, चिंचवड
शालेय मुले व पालकांच्या सुरक्षेसाठी आपत्कालीन सुट्टी आहे. अतिवृष्टीच्या काळात वर्षाविहार, भ्रमंती तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे चुकीचे आहे. घरात थांबून मुलांशी संवाद साधावा, बालसाहित्य त्यांना उपलब्ध करून द्यावे.- श्रीकांत चौगुले, शिक्षक व साहित्यिक