पिंपरी : शहरात मंगळवारी (दि. २७) पावसाची उघडझाप सुरू राहिली. दुपारपर्यंत उघडीप राहिली, दुपारनंतर जोरदार सरी कोसळल्या. धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाला असून, आतापर्यंत १९० मिमीची पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पेरण्यांना चांगलीच गती आली असून, पेरणीसाठी मावळातील शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे.
लोणावळा, मावळसह पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारपासून पावसाला सुरुवात झाली. पाऊस एक तर उशिरा सुरू झाला, त्यातही त्याला ताकद लागत नाही. पेरणीयोग्य पाऊस सुरू असला, तरी जून संपत आला, तरी जमिनीत अपेक्षित पाऊस झालेला नाही. मंगळवारी पावसाची भुरभुर राहिली. मात्र, त्यानंतर आकाश पांढरेशुभ्र झाले, दुपारपर्यंत ऊन राहिले. दुपारी साडेतीन वाजता जोरदार सरी कोसळल्या. त्यानंतर, आकाश ढगाळ राहिले. मागील दोन दिवसांच्या तुलनेत मंगळवारी धरणक्षेत्रातही पाऊस कमी राहिला.
धरणात १७.५५ टक्के पाणीसाठा...
धरणक्षेत्रात जोरदार पाऊस होऊन, धरणे लवकर भरावीत, अशी प्रार्थना शेतकऱ्यांसह सर्व जण करीत आहेत. धरणातील पाणीसाठा कासवगतीने वाढत आहे. पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात सध्या १७.५५ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.