पिंपरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पिंपरी चिंचवड दौऱ्यादरम्यान सोमवारी (23 जुलै) चिंचवड येथे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी निदर्शने केली. मराठा आरक्षणासह प्रलंबित मागण्यांसाठी ही निदर्शने करण्यात आली. यावेळी पोलिसांनी मराठा क्रांती मोर्चाच्या २० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. सकाळी साडेदहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने मुख्यमंत्र्यांबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. क्रांतीवीर चाफेकर स्मारकाच्या भूमिपूजन समारंभानिमित्ताने मुख्यमंत्री शहर दौऱ्यावर आले आहेत. मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यावेळी आंदोलन करणार असे पत्रक पिंपरी-चिंचवड शहर मराठा क्रांती मोर्चाने रविवारी काढले होते. चिंचवडच्या लोकमान्य हॉस्पिटलसमोर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी जोरदार निदर्शने केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध करण्यात आला. या मोर्चानंतर मराठा समाजातील २० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी घोषणाबाजी करण्यात आली. सतीश काळे, नकुल भोईर, सुधीर उंडे, रसीद सय्यद, मारुती भापकर, ज्ञानेश्वर लोघे, विनायक जगताप,अक्षय बुंदील, प्रकाश जाधव, गणेश कोकाटे, वैभव जाधव अशी ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांची नावे आहेत.
'या' आहेत मराठा समाजाच्या मागण्या
- मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावे.
- मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.
- राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठ्यांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अध्यादेश काढून त्यांचे त्वरित कायद्यात रुपांतरण करावे.
- अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेअंतर्गत कर्ज देण्यासाठी बँकाना सक्तीचे आदेश द्यावेत.