पिंपरी : चिंचवड विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक लाखाहून अधिक मते घेऊन महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी बाजी मारली. वाकड गावठाणातील दोन फेऱ्या वगळता त्यांनी मामुर्डी, किवळेपासून तर सांगवीपर्यंत सर्वच गावांतून बाजी मारल्याचे दिसून आले.
चिंचवड विधानसभेच्या आखाड्यामध्ये एकूण २१ उमेदवार होते. त्यापैकी महायुतीचे उमेदवार शंकर जगताप आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे, अशी दुरंगी लढत झाली. या निवडणुकीमध्ये सलग पाचव्यांदा जगताप पॅटर्न यशस्वी झाला. २००९ मध्ये विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाली, तेव्हापासून आजपर्यंत या मतदारसंघावर जगताप कुटुंबाचे वर्चस्व राहिले आहे.
पावणेसात लाख मतदार संख्या असलेला हा सर्वात मोठा मतदारसंघ आहे. ५८.३३ टक्के मतदान झाले होते. मतदारसंघाचे किवळे, रावेत हे एक टोक असून, दुसरे टोक मुळा नदीच्या सांगवीपर्यंत आहे. नदीच्या अलीकडे आणि पलीकडे, असा दोन भागांत हा मतदारसंघ विभागला गेला आहे. नदीच्या अलीकडच्या भागात अर्थात पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, सांगवी, नवी सांगवी, पिंपळे निलख, वाकड, काळेवाडी, रहाटणी, थेरगाव या भागांचा समावेश होतो. तर नदीच्या पलीकडे अर्थात चिंचवडगाव वाल्हेकरवाडी, किवळे, रावेत पुनावळे या भागांचा समावेश होतो. या दोन्ही भागांत भाजपचे वर्चस्व असल्याचे दिसून आले.
किवळेपासून ते चिंचवडपर्यंत आघाडी!
मतमोजणीची सुरुवात मामुर्डी किवळे, रावेत पासून झाली. पहिल्या टप्प्यामध्ये चिंचवड वाल्हेकरवाडीपर्यंत बारा हजार मतांची आघाडी जगताप यांनी घेतली. त्यानंतर वाल्हेकरवाडी चिंचवडगाव परिसरामध्ये सुमारे १३,५०० मतांची आघाडी घेतली. पुढे थेरगाव, रहाटणी काळेवाडी या भागांतही आघाडी कायम राहिली.
वाकड परिसरात आघाडी कमी!
शंकर जगताप यांना वाकड गावठाण आणि काही परिसरांमध्ये कलाटे यांच्या तुलनेमध्ये दोन फेऱ्यांमध्ये सुमारे चार हजार मते कमी मिळाली. पिंपळे गुरव, जुनी सांगवीत आघाडी जास्त, नवी सांगवीत आघाडी घटली. जगतापांचे होमपीच असणाऱ्या पिंपळे गुरव, जुनी सांगवी या परिसरात ८० टक्के मतांची आघाडी मिळाली. नवी सांगवी परिसरात ही आघाडी थोडीशी कमी झाली. पिंपळे सौदागर परिसरातील काही भागांमध्ये जगताप यांनी आघाडी घेतली असल्याचे दिसून येत आहे.