चिंचवड : राष्ट्रभक्ती व देवभक्ती ही धर्माने दिलेली भक्ती आहे. विश्वगुरू होण्यासाठी धर्माने वागले पाहिजे. संत परंपरेत संतांनी धर्मच सांगितला आहे, असे मत जगद्गुरू शंकाराचार्य महाराज यांनी व्यक्त केले. चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने मोरया गोसावी समाधी मंदिर परिसरातील देऊळमळा येथे श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य विश्वस्थ मंदार देव महाराज, खासदार श्रीरंग बारणे, विश्राम देव, आनंद तांबे, राजेंद्र उमाप, विनोद पवार, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, अपर्णा डोके, करुणा चिंचवडे, मोरेश्वर शेडगे, गजानन चिंचवडे आदी मान्यवर उपस्थित होते. सांगलीमधील संभाजी भिडे गुरुजी यांना करवीर पीठाचे जगद्गुरू शंकाराचार्य यांच्या हस्ते या वर्षीचा श्री मोरया गोसावी जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या प्रसंगी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे कृष्णा पळुस्कर, प्रसाद पाचलग, ह.भ.प. दीपक रास्ते, संगीता दापरे, प्रा. सुरेश वाळेकर, भालचंद्र देव, पामानंद जमतानी, डॉ. प्रज्ञा रायरीकर, प्रीती वैद्य, संतोष झोडगे यांना मोरया गोसावी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सौरभ ओंझळेकर व अवधूत कुलकर्णी या दोन विद्यार्थ्यांना वेध शाळेतील विशेष शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देऊन सन्मानित करण्यात आले. भाद्रपद महिन्यातील मंगलमूर्ती पालखी चिंचवड ते मोरगावला घेऊन जाणारे चिंतामणी मोकाशी व संभाजी जाधव यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मोडी लिपी अभ्यासक श्रुती गावडे हिने बनविलेली मोडी लिपीतील विशेष फ्रेम भिडे गुरुजींना भेट देण्यात आली. या निमित्ताने भिडे गुरुजींच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी पुरस्कराला उत्तर देताना ह.भ.प़ रास्ते यांनी हा पुरस्कार पुढे जाण्याची प्रेरणा देईल, असे म्हणत या पुरस्काराने सर्व जण आज धन्य झाल्याची भावना पुरस्कारार्थींच्या वतीने व्यक्त केली. भजन, कीर्तन, आरोग्य शिबीर, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनातून हा महोत्सव सध्या सुरू आहे. शुक्रवार पहाटे महापूजा, अभिषेक होणार असून, सकाळी सात वाजता मोरया गोसावी समाधी मंदिरावर हेलिकॅप्टरमधून पुष्पवृष्टी होणार असून, दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असल्याचे मुख्य विश्वस्थ मंदार देवमहाराज यांनी सांगितले.
संभाजी भिडे गुरुजी यांना मोरया गोसावी जीवन गौरव पुरस्कार प्रदान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2017 11:45 PM