मोशी : मोशी येथील सफारी पार्कसाठी आरक्षित असलेली जागा पुणे महानगरपालिकेला कचरा डेपोसाठी देण्यास मोशी ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. त्याविरोधात एकत्र येत रविवारी ग्रामस्थांनी गावबंद ठेवत शासनाच्या निर्णयाचा निषेध केला. यावेळी मोशी गावच्या या भूमिकेला भोसरी, चऱ्होली, चिखली, डूडुळगाव या नजीकच्या गावांनी देखील पाठिंबा दिला असून पुण्याच्या घनकचरा व्यवस्थापनास जागा देण्यास जाहीर विरोध केला आहे.
रविवारी सकाळपासूनच गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. विशेषतः नागेश्वर महाराज उपबाजार समितीचे कामकाज देखील बंद ठेवण्यात आले होते. यामुळे अनेक शेतकऱ्यांना दूरच्या बाजार समितीत भाजीपाला घेऊन जावे लागले. या बंदमध्ये स्पाईन सिटी मॉल, जय गणेश साम्राज्य संकुल, सेक्टर ११, संत नगर, प्राधिकरण, वाघेश्वर कॉलनी, आदर्श नगर, खान्देश नगर, लक्ष्मी नगर, मोशी मुख्य चौक, देहूरस्ता, शिव रस्ता, शिवाजी वाडी आदी भागातील सर्व व्यापारी वर्गाने उत्स्फुर्तपणे बंद मध्ये सहभागी होत दुकाने बंद ठेवल्याचे दिसून आले. सुट्टीचा वार असल्याने नोकरदार वगार्ला देखील आठवडाभराच्या आवश्यक खरेदीसाठी बाहेर पडणे बंदमुळे टाळावे लागले. गावातून जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावर देखील शुकशुकाट दिसून येत होता बंदचा मोठा फटका छोटी मोठी दुकाने व व्यावसायिकांना, प्रवाशी वाहतूक करणाऱ्या रिक्षांना बसला बंदमुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे जवळपास टाकल्याचे दिसून आले. अत्यावश्यक सेवा मात्र चालू ठेवण्यात आल्या होत्या. या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेत येत्या पंधरा दिवसात पुण्याच्या कचरा डेपोसाठी मोशीतील जागा देण्याचा प्रस्ताव रद्द न केल्यास पिंपरी चिंचवड शहराचा कचरा देखील मोशीत टाकू दिला जाणार नाही. तसेच वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू प्रसंगी रक्त सांडू पण जागा देणार नाही असा इशारा देण्यात आला.
रविवारी सकाळी दहाच्या सुमारास ग्रामस्थांनी नागेश्वर महाराज मंदिरात एकत्र येत निषेध सभा घेतली यावेळी आमदार महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे,माजी महापौर नितीन काळजे, विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पुण्याच्या कचरा डेपोला मोशीतील नियोजित सफारी पार्कची आरक्षित जागा पुणे महानगरपालिकेला स्वतंत्र कचरा डेपोसाठी देण्यास जाहीर विरोध दर्शविला असून मोशी ग्रामस्थांच्या बाजूने ठामपणे उभे राहणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.याप्रसंगी मोशी गावातील आजी, माजी नगरसेवक, नगरसेविका, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व राजकीय मतभेद व पक्षीय राजकारण विसरून राजकीय नेते, कार्यकर्ते या कचरा डेपोच्या प्रश्नावर आक्रमक झाल्याचे दिसून आले.
सहनशिलतेचा अंत
मोशी ग्रामस्थांवर यापूर्वीच पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचा शंभर टक्के कचरा एकट्या मोशी गावच्या माथी लादण्यात आला आहे. त्याचा परिणाम अद्यापही मोशी भागातील सर्व सामान्य जनता सहन करत असून या कचरा डेपोमुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पिंपरी पालिकेचा सुमारे आठशे मेट्रिक टन नित्याचा दैनंदिन कचरा याभागात टाकले जात असताना त्याला नागरिकांचा यापूर्वी विरोध होता. शहराचा कचरा दोन कचरा डेपोत विभागने गरजेचे असताना पालिका प्रशासन त्याबाबत ठोस पाऊले उचलत नसून तशी पावले उचलणे गरजेचे असताना प्रशासन मात्र अजून एक कचरा डेपो मोशीकरांवर लादू पाहत आहे. ते कदापि होऊ देणार नसल्याचा एल्गार मोशीकरांनी निषेध बैठकीत एकमुखाने केला आहे.