नारायण बडगुजर पिंपरी : लोकसभेच्या मावळ मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेत प्रमुख पदांवर महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या मावळ लोकसभा निवडणुकीत महिलाराज दिसून येत आहे. प्रशासकीय आणि संबंधित विभागातील मूळ जबाबदारी सांभाळून महिला अधिकारी सक्षमपणे निवडणुकीचे अतिरिक्त कामकाज सांभाळत आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघाच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकारीपदी कविता द्विवेदी यांची नियुक्ती झाली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी पदासह विविध पदांची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. सन २०१७ पासून पीएमआरडीएत त्या कार्यरत आहेत. विविध निवडणुकींसाठीही त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. सध्या त्यांच्याकडे मावळ मतदारसंघाची मुख्य जबाबदारी आहे. पुणे आणि रायगड जिल्ह्यात हा मतदारसंघ विभागला आहे. पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा त्यात समावेश आहे. विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघासाठी एक सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. कर्जतसाठी प्रांताधिकारी वैशाली परदेशी, उरणसाठी दीपा भोसले, चिंचवडसाठी मनीषा कुंभार आणि पिंपरीसाठी उपजिल्हाधिकारी वैशाली उंटवाल सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.शहरातील या तीनही विधानसभा मतदारसंघांसाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महिलांची नियुक्ती आहे. पुण्यातील भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी भोसरी मतदारसंघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. माळी यांनी कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत विविध जबाबदाºया पार पाडल्या आहेत. फलटणला प्रांताधिकारी म्हणून, तसेच विविध निवडणुकांसाठीही प्रमुख पदांवर काम केले आहे. चिंचवडच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा कुंभार २००९च्या उपजिल्हाधिकारी आहेत. सांगली जिल्हा पुनर्वसन अधिकारी, सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरीच्या प्रांताधिकारी आदी पदांवर त्यांनी सक्षमपणे काम केले आहे. सध्या त्या पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्येही त्यांनी विविध पदांची जबाबदारी सांभाळली आहे.पिंपरीच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली उंटवाल यांनी सहा वर्षे विक्रीकर विभागात अधिकारी म्हणून काम केले आहे. निवडणुकीचे कामकाज आणि भोरच्या प्रांताधिकारी पदासह सांगली, सातारा जिल्ह्यांतही विविध पदांची जबाबदारी सांभाळली आहे.
नोडल अधिकारीपदीही महिलापुणे जिल्हा उपमुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मोनिका सिंह यांच्याकडे जबाबदारी आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीशी संबंधित विविध प्रमुख पदांवर महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात नोडल अधिकारी म्हणून पल्लवी सोनवणे, प्रज्ञा वाळके, गौरी पवार, यांचा समावेश आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राधिका हावळ, तसेच अन्य विविध पदांसाठीही महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.