- महादेव मासाळ
पिंपळे सौदागर (पुणे) : जगात माणुसकी जिवंत असल्याची आणखी एक घटना पुण्यातून समोर आली आहे. हिंजवडी येथे आयटी पार्क येथे कार्यरत असणाऱ्या सांगवी येथील रहिवासी पूनम विनोद शंकरन यांनी तब्बल ३२ वर्षांनंतर एका चुकलेल्या महिलेची तिच्या कुटुंबीयांसोबत भेट घडवून आणली. पूनम या हिंजवडी येथील आयटी पार्क येथे कामाला आहेत.
जुनी सांगवी येथील शेवटचा बस थांबा आहे. या परिसरात गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून एक वयोवृद्ध महिला भरकटली होती. पूनम या ठिकाणाहूनच ऑफिसला येत -जात असल्याने त्या या आजीला पाहात होत्या. त्यांनी तिला चहा, नाश्ता पाणी आणून देत. त्यांच्या मनात त्या आजीविषयी आपुलकी निर्माण झाली. त्यांनी याबाबत पतीला कल्पना दिली. त्यानंतर पतीनेदेखील पुढाकार घेत त्या आजीला भेटण्यासाठी ते दोघेही गेले. त्यांनी आजीला खायला देत आपुलकीने विचारपूस केली. त्यावेळी आजी फक्त बेल पिंपळ या गावाचेच नाव सांगत होती.
हे सर्व घडल्यानंतर पूनम यांना त्यांचे मन स्वस्थ बसू देईना त्यांनी बेल पिंपळ या गावाबद्दल आपल्या मित्र मैत्रिणी, नातेवाइकाकडे चौकशी सुरू केली. त्या चौकशी दरम्यान त्यांना बेल पिंपळ गावाविषयी माहिती मिळाली. बेल पिंपळ हे गाव अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील असल्याचे समजले. यासाठी त्यांना त्या गावातील एका नागरिकाने सांगितले. पूनम यांनी त्या नागरिकांची मदत घेऊन बेल पिंपळ गावातील पोलिस पाटील संजय साठे यांच्याशी संपर्क केला आणि वृध्द महिलेबाबत माहिती दिली. तिचा फोटो त्यांना पाठवला. फोटो पाहताच पोलिस पाटलाने क्षणाचाही विलंब न करता ही महिला या गावातील असल्याचे समोर आले. त्या महिलेचा मुलगा आणि मुलगी याच गावात राहत असल्याने पोलीस पाटील साठे यांनी त्यांना तात्काळ पुण्याला पाठवले.