पिंपरी, दि. 16 - मोरवाडी, म्हाडा कॉलनीतून एसएनबीपी महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर हुल्लडबाज तरूणांची भरधाव मोटार रस्त्यालगतच्या झाडाला धडकली. या मोटारीची धडक इतकी जोराची होती की, अंतर्गत रस्त्यावर असूनही धडक बसताच, एअर बॅग बाहेर आल्या. रस्त्यालगत उभ्या केलेल्या चार दुचाकींचे नुकसान झाले. जवळच बाळाला घेऊन रूग्णालयात जात असलेल्या महिलेला मोटारीचा धक्का लागला. प्रसंगावधान दाखवून तिने बाळाला अलगद बाजुला ठेवले. तिला थोडी दुखापत झाली. बाळ बचावले. मोटारीतील तरूणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे.
मोरवाडी, एसएनबीपी हा अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे. महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी काही तरूण त्या मोटारीत होते. पावणेबाराच्या सुमारास झालेल्या या अपघाताने रस्त्यावरील वाहतूक खोळंबली. मोटारीत मागील बाजुस लाकडी दांडके ठेवलेली होती. या मार्गावरून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मोटारींना बंदी घालावी. केवळ शाळेच्या बसगाड्यांनाच मुभा द्यावी. खासगी वाहने या मार्गाने आत नेण्यास बंदीघालावी. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.