पिंपरी : रिक्षाचालक-मालकांचे अनेक प्रलंबित प्रश्न सरकारने न सोडविल्यास रिक्षाचालक-मालकांच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय तळेगाव येथे झालेल्या दोनदिवसीय शिबिरात घेण्यात आला.आॅटो रिक्षाचालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने दि. २७ आणि २८ एप्रिल रोजी राज्यातील रिक्षाचालक संघटना पदाधिकारी याचे शिबिर तळेगाव येथील राममनोहर लोहिया विद्यापीठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित करण्यात आले होते. या वेळी कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव, सरचिटणीस बाबा कांबळे, कार्याध्यक्ष विलास भालेकर, उपाध्यक्ष प्रमोद घोणे (मुंबई),गफार नदाफ (कराड), कासम मुलानी (नवी मुंबई), मधुकर थोरात (रायगड), मल्हार गायकवाड (कल्याण-डोंबिवली), मारुती कोंडे, सुनील बोर्डे, इलियाज खान (अकोला), अनेद चौरे (नागपूर), मोक्षस्वर लोकरे (चंद्रपूर), अबास शेख (बल्लाळा), अहमद बागवाले (नांदेड), श्रीकांत आचार्य, बाबा शिंदे, प्रदीप भालेराव, आनंद अंकुश, बाबा सय्यद ,चंद्रकांत गोडबोले (पुणे), सुदाम बनसोडे (पिंपरी-चिंचवड) उपस्थित होते.राव म्हणाले, ‘‘ओला-उबेर विरोधातील लढाईला यश आले असून, शासनाने नियमावली तयार केली आहे. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे.’’ बाबा कांबळे म्हणाले, ‘‘फक्त रिक्षाचालकांसाठी परिवहन खात्यांतर्गत कल्याणकारी मंडळ स्थापन करावे. काही संघटना रिक्षाचालकांचे मंडळ कामगार खात्याकडे वर्ग करून रिक्षाचालकांचे नुकसान करीत आहेत. भालेकर यांनीही या वेळी मार्गदर्शन केले. (वार्ताहर)
रिक्षाचालकांसाठी आंदोलन
By admin | Published: April 29, 2017 4:13 AM