किवळे : देहूरोड दारूगोळा कोठाराचा रेड झोन रद्द करावा अथवा रेड झोन हद्द कमी करण्याच्या मागणीसाठी फुले शाहू आंबेडकर विचार मंचच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या धरणे आंदोलनात सहाव्या दिवशी गुरुवारी दुपारी थेरगाव येथे खासदार श्रीरंग बारणे यांच्या घरासमोर आंदोलन करण्यास पोलिसांनी मनाई केल्याने आंदोलकांनी बारणे यांच्या स्वीय सहायकास संबंधित निवेदन दिले.त्या वेळी त्यांनी आंदोलकांना एक लेखी पत्र दिले असून, माझ्या घरासमोर आंदोलन करण्यापेक्षा संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले, तर सरकारला जाग येईल व नागरिकांच्या भावना त्यांना समजतील, अशा आशयाचे पत्र दिले आहे .फुले शाहू आंबेडकर विचार मंचाचे अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे यांना खासदार श्रीरंग बारणे यांचे स्वीय सहायक उदय आवटे यांनी थेरगाव येथे पत्र दिले . या वेळी देहूरोड राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष मिकी कोचर, विजय पवार आदी उपस्थित होते.‘रेड झोन प्रश्नाबाबत लोकसभेत प्रश्न उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले होते. तसेच तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर व विद्यमान संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्यासमवेत आजपर्यंत अनेक बैठका घेतल्या आहेत. या प्रश्नाबाबत देहूरोड कॅन्टोन्मेंटचे सर्व सदस्य, तसेच रेड झोन कृती समिती यांची संरक्षण मंत्र्यांशी भेट घडवून चर्चा केली होती. संरक्षण सचिवांनी पत्रही दिले आहे. रेड झोन प्रश्न सोडविणे खूप गंभीर असून, सरकार याबाबत विचार करीत आहे. मी आजतागायत प्रयत्न केले आहेत. त्यामुळे माझ्या घरासमोर आंदोलन करण्यापेक्षा संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले तर सरकारला जाग येईल व नागरिकांच्या भावना त्यांना समजतील. लोकसभा अधिवेशन असल्याने मी दिल्लीत आहे. दिल्लीत आंदोलन करावे. माझा पाठिंबा राहील, असे खासदार बारणे यांचे पत्र तंतरपाळे यांना दिले आहे.
मंत्र्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करा- श्रीरंग बारणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2019 2:17 AM