पिंपरी : सनदशीर मार्गाचा अवलंब करून लाखो समाजबांधवांनी राज्यभर मूक मोर्चे काढले. शांततेच्या मार्गाचा अवलंब करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला. अद्यापही मराठा समाजबांधवांच्या मागण्यांची शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे समाजाच्या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी मराठा समाजबांधवांनी पुण्यासह पिंपरी-चिंचवड परिसरात ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन केले. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन झाले. या आंदोलनात प्रवीण शिर्के, विलास भैरट, रोहित शिर्के, बी. एन. तापकीर, सागर पवार यांच्यासह म्हाडा वसाहतीत सुरू असलेल्या गृहप्रकल्पावर काम करणारे शिर्के कन्स्ट्रक्शन कंपनीतील कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. म्हाडा गृहप्रकल्पाजवळ सभा घेण्यात आली. त्या वेळी आंदोलकांनी समाजाची आंदोलनामागील भूमिका स्पष्ट केली. वाकड, भूमकर वस्ती येथे पुणे-मुंबई महामार्गावर रास्ता रोको आंदोलन झाले. मराठा समाजबांधवांच्या विविध मागण्यांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रवीण पाटील, सतीश काळे, विनायक जगताप, नकुल भोईर, विष्णू नाणेकर, प्रतीक इंगळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. सरकारने या मागण्यांची दखल न घेतल्यास आणखी तीव्र आंदोलन केले जाणार आहे. ६ मार्च २०१७ ला मुंबईत मोर्चा काढण्यात येणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले. (प्रतिनिधी)बंदोबस्त : पोलिसांचा फौजफाटा तैनातभोसरीतील छत्रपती शिवाजी चौकात (पांजरपोळ) शेकडो कार्यकर्त्यांनी पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक अडवून चक्का जाम केला. आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शांततेत, शिस्तबद्धरीत्या झाले. त्यामध्ये विठ्ठल सुरनर, बळीराम कारळे, मदन भोईर, अरविंद डोरे, मीरा ढोक, संगीता लोहार, सुरेखा बंडलकर, लक्ष्मण देसाई, विष्णू फरकांडे, युवराज पालकर, दीपक गवळी, संभाजी बालघरे, विजय बालघरे, संतोष बोऱ्हाडे यांनी मार्गदर्शन केले. आंदोलनात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. या वेळी १२५ पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता.
उद्योगनगरीत शांततेत आंदोलन
By admin | Published: February 01, 2017 4:42 AM