पिंपरी : पुण्यात कोरोनाचा आलेख वाढत असताना पिंपरी-चिंचवडमध्ये रुग्ण आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यास भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध दर्शविला आहे. शहरात वैद्यकीय सुविधा मर्यादित आहे. रुग्ण वाढल्यास आपण कोठे जायचे? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तर वैद्यकीय किंवा रुग्णसेवेस कोणतीही सीमा नसते? हा कोणत्याही पक्षाने प्रतिष्ठेचा मुद्दा बनवू नये, राजकारण करू नये, सर्वांनी एकत्र येऊन कोरोनास हरवावे, अशी भूमिका शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांनी मांडली आहे. पुणे महापालिका हद्दीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तेथील आरोग्य व्यवस्थेवर ताण येत असल्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. प्रशासनाच्या या भूमिकेला शहरातील सत्ताधाºयांनी आणि विरोधकांनी विरोध केला आहे.पिंपरी-चिंचवड शहराची सध्या लोकसंख्या सुमारे २७ लाखांच्या घरात आहे. पुणे महापालिका प्रशासनाकडे पिंपरी-चिंचवडच्या तुलनेत मनुष्यबळ अधिक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पुण्यामध्ये सध्यस्थितीला जास्त दिसत आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित रुग्णांची वाढणारी संख्या लक्षात घेता आगामी काळात थर्ड स्टेजला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.पिंपरी-चिंचवडमध्ये अतिरिक्त रुग्ण उपचारासाठी दाखल केल्यास पिंपरी-चिंचवडच्या आरोग्य व्यवस्थेवर ताण येणार आहे. पिंपरी-चिंचवडमधील वाढलेले रुग्ण आपण भविष्यात कुठे दाखल करणार आहोत, तर रूग्णांबाबत राजकारण करू नये, अशी टीका केली जात आहे.पुण्यातील रुग्णांना पिंपरी-चिंचवडमध्ये उपचारासाठी दाखल करण्याबाबत माझा विरोध हा तांत्रिक अडचणींना गृहीत धरून आहे. पुण्याची क्षमता कधीही पिंपरी-चिंचवडपेक्षा जास्त आहे. कोरोना नियंत्रणासाठी सध्या चार सनदी अधिकाºयांची टीम नेमली आहे. त्यामुळे पुणे महापालिका व स्थानिक आस्थापनांनी तेथील रुग्णांचा भार पिंपरी-चिंचवड महापालिकेवर देऊ नये, अशी माझी प्रामाणिक मागणी आहे.- महेश लांडगे, आमदार, शहराध्यक्ष भाजपआपले शहर कोरोनामुक्त होत असताना दिल्लीतील कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही नागरिकांमुळे कोरोनाच्या संख्येत वाढ झारली. पुण्यात वैद्यकीय क्षमता मोठी आहे. त्यांनी पुण्याचे रुग्ण पिंपरी-चिंचवडला न आणता त्यांच्या कार्यक्षेत्रातच उपचार करावेत. पिंपरी-चिंचवडमध्ये वैद्यकीय सुविधा कमी आहेत. तसेच डॉक्टर, परिचारिका असे पुरेसे मनुष्यबळही नाही. त्यामुळे आपल्याकडे रुग्णवाढ झाल्यास बेडची संख्या कमी पडू शकते. - नाना काटे, विरोधी पक्षनेते
वैद्यकीय उपचारासाठी कोणतीही शहरांची सीमा नसते. आपले काही पेशंट पुण्यात आणि पुण्याचे काही पेशंट आपल्याकडे उपचार घेत आहेत. त्यामुळे कोरोना हा अधिक पसरू नये, यासाठी दोन्ही शहरांनी उपाययोजना करायला हव्यात. तसेच आपले शहर रेडझोनमधून ग्रीन झोनमध्ये कसे आणता येईल, याबाबत विचार करायला हवा. त्यानुसार उपाययोजना करायला हव्यात.- राहुल कलाटे, शिवसेना गटनेते
रूग्णांबाबत राजकारण करू नये, आपले रूग्ण पुण्यात आहेतच. पुण्याने आपले रूग्ण परत पाठविले तर काय? एकत्रितपणे कोरोनाचा सामना करायला हवा. कोरानामुक्त व्हायला हवे.- सचिन चिखले, गटनेते, मनसे
पुणे आणि पिंपरी-चिंचवड ही दोन शहरे एकच आहेत. रुग्णसेवा किंवा वैद्यकीय सेवेस विभागाचे बंधन नसते. आपण एकाच देशात, राज्यात राहतो. त्यामुळे शहर माझे व तुझे असे न करता व्यापक जनहिताचा विचार करायला हवा. पुण्याचे रुग्ण घ्यायचे की नाही, याबाबत महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने निर्णय घ्यावा. आपण सर्वांनी एकत्रितपणे येऊन कोरोनास दूर घालवायला हवे. यात कोणीही राजकारण करू नये. हा प्रतिष्ठेचा आणि अस्मितेचाही मुद्दा कोणी करू नये.- सचिन साठे, शहराध्यक्ष, काँग्रेस