पिंपरी : मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करण्याचे प्रकार उघडकीस आल्या आहेत. पिंपरीगाव, दापोडी, थेरगाव, सांगवी, हिंजवडी, रहाटणी, पिंपळे निलख या भागातील एकूण ३७ घरगुती आणि व्यापारी वीजमीटर जोड खंडित करण्यात आले. एकूण १६ लाख ७८ हजार रुपयांची ही वीजचोरी आहे. या सर्वांवर गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य वीजवितरण पिंपरी विभागीय कार्यालयातंर्गत केलेल्या वीजमीटरच्या विशेष तपासणी मोहिमेत एकूण ३७ ठिकाणी हा प्रकार उघडकीस आला. या मोहिमेचे महावितरणच्या महिला अभियंत्यांनी नेतृत्व केले. या मोहिमेत सुमारे १४० घरगुती व व्यापारी वीज मीटरची २३ व २४ नोव्हेंबर या दोन दिवसांत तपासणी करण्यात आली. यासाठी १३ पथके तयार करण्यात आली होती. प्रत्येक पथकात अभियंता, लेखा लिपिक, दोन जनमित्र असा चार जणांचा समावेश आहे. तपासणीत चिंचवडमधील ६, खराळवाडीतील १८ आणि सांगवी उपविभागातील १३ असा एकूण ३७ ठिकाणी १ लाख २४ हजार ९०० युनिटच्या १६ लाख ७८ हजार रुपयांची चोरी आढळून आली. याप्रकरणी संबंधित ग्राहकांचा वीजजोड खंडित करून त्यांच्यावर भारतीय विद्युत कायदा २००३ नुसार कलम १३५ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे. पिंपरी विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय औंढेकर, सहायक अभियंता शैलजा सानप, वहिदा बागवान, स्मिता ओहोळ, सुरेखा पोळ, सुरेखा भारती, निवेदिता पाटील, ऐश्वर्या, वस्त्रद, सुप्रिया जोशी, कार्यालयीन सहायक दीपाली झापर्डे, पूजा गजघाटे आदीसह सुमारे ६५ अभियंता, कर्मचारी, जनमित्र यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. यापूर्वी आॅक्टोबर महिन्यात झालेल्या वीजमीटर तपासणी मोहिमेत खराळवाडी, चिंचवड, सांगवी उपविभागातील ४२ ठिकाणी १६ हजार ८५ हजार रुपयांची वीजचोरी आढळून आली होती. तसेच, एमआयडीसीतील कंपनी, रावेत येथील आइस फॅक्टरी, रहाटणी येथील फ्लोअर मिल, आकुर्डी, चिखली, मोशी भागात वीजचोरीचे प्रकार उघडकीस आले आहेत. महावितरणच्या विशेष तपासणी मोहिमेत गेल्या दोन महिन्यांत वीजचोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. मोहीम शहरात कायम राहणार आहे. (प्रतिनिधी)
महावितरणचा १४० जणांना झटका
By admin | Published: November 28, 2015 12:40 AM