पिंपरी : रस्त्यावर मोबाइलवर बोलत उभ्या असलेल्या तरुणीला मोटारीतून आलेल्या पाच जणांनी जबरदस्तीने मोटारीत बसविले. तिचा विनयभंगही केला. या वेळी तरुणी आरडाओरडा करीत होती. रस्त्यावरील गतिरोधकामुळे मोटारीचा वेग मंदावल्याचा फायदा घेत तरुणीने मोटारीतून बाहेर उडी घेतली. ही घटना वाकड-हिंजवडी रोडवर गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.याप्रकरणी २२वर्षीय पीडित तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित तरुणी मूळची गोव्याची असून, ती हिंजवडी येथील इव्हेन्ट मॅनेजमेंट कार्यालयात फोटोग्राफर आहे. गुरुवारी रात्री ती वाकड-हिंजवडी रोडवरील हॉटेल सौंदर्य गार्डनसमोर फोनवर बोलत थांबली होती. त्या वेळी एक मोटार तिच्या जवळ आली. मोटारीत पाच जण होते. त्यांनी तिला जबरदस्तीने मोटारीत बसविले. त्यानंतर मोटार डांगे चौकाच्या दिशेने निघाली.घटनास्थळावरुन हिंजवडी आयटी पार्क दोन किलोमीटर अंतरावर आहे, तर हिंजवडी गावठाण अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आहे. तरुणीला ज्या ठिकाणी आरोपींनी मोटारीत बसविले त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी रहदारी नसते. केवळ वाहनांची ये-जा सुरू असते. आयटीनगरीच्या परिसरात यापुर्वीही अनेकदा असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे येथील सुरक्षिततेचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. याठिकाणी सायंकाळी व रात्रीच्या वेळेत पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी आहे. आयटी परिसरामध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी बंदोबस्तामध्ये वाढ करण्याची गरज आहे.>सीसीटीव्हीद्वारे आरोपींचा शोधमोटारीतील आरोपींनी तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने प्रतिकार करीत आरडाओरडा केला. मोटार डांगे चौकात आली असता रस्त्यावरील गतिरोधकामुळे मोटारीचा वेग मंदावला. त्याच वेळी तरुणीने मोटारीतून बाहेर उडी घेतली. याप्रकरणी पीडितेने फिर्याद दिली असून, हिंजवडी पोलिसांनी पाच अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही व पीडित तरुणीने सांगितलेल्या वर्णनावरून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
अपहरण करून विनयभंग, आरोपी फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 2:02 AM