पिंपरी : 'मुळशी पॅटर्न'सिनेमाच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांच्या जमिनीचा प्रश्न ते गुन्हेगारी या सामाजिक विषयावरील विषय प्रेक्षकांसमोर मांडला. सिनेमाच्या विषयामूळे सुरूवातीला हा चित्रपट घेण्यासाठी कोणीही निर्माते तयार होत नव्हते. पत्नीचे दागिने मोडून, मित्रांकडून पै-पै गोळा करून मुळशी पॅटर्न प्रदर्शित केला असल्याचा किस्सा अभिनेते प्रवीण तरडे यांनी सांगितला आहे.
निमित्त होते जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ यांच्या वतीने आयोजित 'शोध मराठी मनाचा' या अठराव्या जागतिक मराठी संमेलनाचे. 'देऊळबंद ते सरसेनापती हंबीरराव एक प्रवास' या विषयावर प्रवीण तरडे यांच्याशी विनोद सातव यांनी संवाद साधला. यावेळी प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता देव गिल हे उपस्थित होते.
''केवळ प्रेक्षकांच्या अभुतपूर्व प्रतिसादामुळे या चित्रपटाला यश मिळाले. या चित्रपटाचा देशात तब्बल १४ भाषांमध्ये रिमेक झाला. त्यानंतर 'सरसेनापती हंबीरराव' हा मराठीतला पहिला बिगबजेट सिनेमा आपल्या हातून तयार होण्याचे भाग्य मिळाले, असेही तरडे यांनी अभिमानाने सांगितले.''
मराठी सिनेसृष्टीत माझे सलग चार सिनेमे हीट झाले
तरडे यांनी मुळशीसारख्या ग्रामीण भागातून येऊन भारती विद्यापीठ कॉलेजमध्ये कबड्डी खेळाडू, युआर ते एकांकीकेसाठी लेखन करून व अभिनय करून पुरूषोत्तम करंडक मिळवण्यापर्यंतचा संघर्षमय प्रवास कथन केला. दुरचित्रवाहिनीवरील कुंकू, पिंजरा यासारख्या मालिकांसाठी आपण लेखन केले. स्वामी समर्थांवर एका लघुपटासाठी आपल्याला लेखन करायची संधी मिळाली. स्वामी समर्थांबद्दल आपल्याला काही माहित नव्हते. मात्र, हे काम मिळवायचेच हे ध्येय ठेवून काम घेतले आणि लघुपटासाठी घेतलेल्या कामातून आपला पहिला सिनेमा 'देऊळबंद'ची निर्मिती झाली. या चित्रपटामुळे माझा नास्तिकतेतून आस्तिकतेपर्यतचा प्रवास झाला. मराठी सिनेसृष्टीत माझे सलग चार सिनेमे हीट झाले. ज्या विषयाला मातीचा वास येतो ते सिनेमे करतो. त्यामुळे यश मिळाले असेही तरडे यांनी नमुद केले.