पिंपरी : आधुनिकतेच्या दिशेने झेपावणाºया पिंपरी चिंचवड शहरात बीआरटी व मेट्रो असे वाहतूक व्यवस्थेचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. परंतु, शहरातील विविध वाहतुकीचे प्रकल्पांचा एकात्मक आराखडा आवश्यक आहे. त्यादृष्टीने भक्ती शक्ती चौकात एकाच ठिकाणी रिक्षा, बस व मेट्रोसह अन्य वाहतूक व्यवस्था उपलब्ध होईल, असे मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट हब उभारण्याची संकल्पना व आराखडा पिंपरी-चिंचवड सिटीजन फोरमने तयार केला आहे.शहरातील नागरी प्रश्नांच्या अभ्याससह उपायोजनांवर अभ्यास करण्यासाठी ‘सिटीजन फोरम’ स्थापन करण्यात आली आहे. फोरममध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश आहे. उत्कृष्ट नगररचना आणि पायाभूत सुविधा या विषयाच्या अभ्यासक व फोरमच्या सदस्या बिल्वा देव यांनी त्यांच्या अनुभवातून मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब संकल्पना मांडली आहे. केवळ संकल्पना मांडली नाही, तर त्याच्यावर हा प्रकल्प कोणत्या ठिकाणी आणि कसा साकारता येईल. या विषयी त्यांनी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे. व्यवसायाने आर्किटेक्ट असलेल्या बिल्वा देव यांच्यासह अन्य सहकारी यांनी शहराच्या विकासात आपले योगदान असावे, या भावनेतून फोरमचे काम सुरू केले आहे. निगडी हे शहराचे असे ठिकाण आहे, तेथून पुणे शहर आणि नव्याने विकसित झालेल्या अन्य भागात जाणारे रस्ते जोडले गेलेले आहेत.सर्वेक्षणानंतर सुचविले पर्यायमहापालिकेच्या अर्थसंकल्पात अर्थिक तरतुदीच्या सूचना करून नागरिकांचा सक्रिय सहभाग नोंदविणाºया फोरमच्या सदस्यांनी मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट हब (बहुपर्यायी मध्यवर्ती वाहतूक केंद्र) या प्रकल्पाची संकल्पना कागदावर उतरविण्यासाठी विशेष परिश्रम घेतले आहे. निगडी हेच ठिकाण या प्रकल्पास योग्य कसे? यासाठी त्यांनी या मार्गावरील वाहनांची संख्या, प्रवाशांचे प्रमाण याचे सर्वेक्षण केले. त्यानंतर प्रकल्पाची आखणी केली आहे, असे बिल्वा देव यांनी सांगितले.निगडी मध्यवर्ती ठिकाणीदेहूरोड, तळेगावहून जुन्या पुणे-मुंबई महामार्गाने निगडीत येऊन शहराच्या अन्य भागात जाता येते. दापोडी ते निगडी असा शहराचा प्रमुख मार्ग आहे. निगडी हे या मार्गाचे शेवटचे टोक मानले जाते. तेथील भक्ती शक्ती चौकातून भोसरी आणि चाकणकडे जाण्याचा मार्ग आहे. प्राधिकरणातून किवळे, विकासनगर, वाकड, हिंजवडीकडे जाणारा मार्ग या चौकाला जोडलेला आहे. निगडी, आकुर्डी प्राधिकरण हा अगदी सुरुवातीपासून नियोजनबद्ध विकसित झालेला परिसर आहे. या भागात उच्चस्तरातील लोकांचे अधिक वास्तव्य आहे. त्यामुळे प्रमुख मार्गाचे शेवटचे टोक असले तरी निगडी हा भाग व्यापकता लक्षात घेतल्यास मध्यवर्ती ठिकाण आहे.पुण्यात कात्रज, धनकवडी, इंदिरानगर या मार्गावर धावणाºया सर्व बसगाड्या निगडीतून फुल्ल होतात. निगडीच्या पुढे गेल्यानंतर कोणत्याही बसथांब्यावर बसमध्ये चढण्यासही जागा उपलब्ध होत नाही. एकूण ७० टक्के प्रवासी निगडीहून प्रवास करणारे असतात. अशीच स्थिती कात्रज ते निगडी बसमध्ये दिसून येते. कात्रजहून निगडीला येणाºया बसगाड्याही भरून येतात. त्यामुळे केवळ पीएमपीचा बसथांबा असून उपयोग नाही. येथून आकुर्डी रेल्वे स्थानकात जाण्यासाठी वाहन सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे.
शहरासाठी ‘मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट हब’, सिटीजन फोरमची संकल्पना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 4:19 AM