ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 26 - मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर पादचारी, दुचाकी व तिनचाकी वाहने, ट्रँक्टर व जनावरे यांना बंदी असताना या मार्गावर डुकरं, म्हशी, कुत्रे ही जनावरे बिनबोभाट फिरत असल्याने या मार्गाची सुरक्षा धोक्यात आली असून ही मुक्की जनावरे रस्त्याच्या मध्ये घुसल्यास वाहनांचा फार मोठा अपघात घडवू शकतात. मुंबई पुणे हा प्रवास जलदगती व्हावा व दोन्ही राजधानीची शहरे हाकेच्या अंतराने जोडली जावी याकरिता मुंबई पुणे द्रुतगती मार्गाची निर्मिती करण्यात आली. भारतातील हा पहिलाच जलदगती मार्ग असल्याने या मार्गावरुन सुसाट धावणार्या वाहनांना कसलाही अडथळा येऊ नये याकरिता पादचारी व मुक्या जनावरांसह दुचाकी, तिनचाकी वाहने व ट्रँक्टर या वाहनांना मार्गावर बंदी घालण्यात आली. मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळे व विदारक आहे. द्रुतगती मार्गाच्या निर्मितीनंतर दोन भागांमध्ये विभागल्या गेलेल्या गावांसाठी व रस्त्याच्या कडेच्या गावांना सर्व्हिस रोड देण्याचा करारात उल्लेख असताना देखिल आजपर्यत आयआरबी कंपनीने द्रुतगती मार्गाला सर्व्हिस रोड दिलेला नाही व महाराष्ट्र शासनाने देखिल सोळा वर्षात याबाबत ठेकेदारांवर मेहेरबानी दाखवत काहिही कारवाई केलेली नसल्याने आज मुंबई पुणे द्रुतगती मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेली तारेची कुंपणे जागोजागी तुटल्याने म्हशी, कुत्रे, डुकरं व अन्य प्राणी सर्रास रस्त्यावर येऊ लागले आहेत. ही मुक्की जनावरे रस्त्याच्या मध्ये मार्गीकेवर आल्यास फार मोठा अपघात या मार्गावर होऊ शकतो याचे भान या मार्गावर टोल गोळा करणार्या ठेवल्यास कंपनीला व महाराष्ट्र शासनाला राहिलेले नाही. तसेच सर्व्हिस रोड नसल्याने रस्त्याच्या दुतर्फा राहणार्या स्थानिक नागरिकांना जीव धोक्यात घालत या मार्गावर नाईलाजास्तव दुचाकी घेऊन येण्याची पाळी आली आहे. जागोजागी पादचारी सर्रास या मार्गावर वाहनांना हात करत उभे असतात व वाहने देखिल मार्गावर थांबू नका या सुचनेकडे दुर्लक्ष करत सर्रास वाहने उभी करतात. दोन दिवसांपुर्वी गाव डुकरांची एक मोठी टोळी कुसगाव येथिल आयआरबी कंपनीच्या कार्यालया शेजारी द्रुतगती मार्गावर आली होती मात्र सुरक्षा यंत्रणेला याचा पत्ताच नाही. दरदिवशी लाखों रुपयांचा टोल गोळा करणार्यांचे द्रुतगती मार्गाच्या सुरक्षेकडे पुर्णतः दुलर्क्ष झाले असल्याने हा मार्ग प्रवासासाठी अतिशय धोकादायक बनला आहे. याला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.