लोणावळा : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील खंडाळा घाटातील दरडप्रवण क्षेत्र असलेल्या खंडाळा एक्झिट ते खंडाळा बोगद्याजवळील एक किलोमीटर अंतरामध्ये डोंगरावरील धोकादायक व सैल झालेले दगड व माती हटवून त्या ठिकाणी संरक्षक जाळ्या बसविण्याचा मोहिमेला पुन्हा सुरुवात झाली आहे. या कामाकरिता खंडाळा एक्झिट ते खंडाळा बोगद्यापर्यंत मुंबईकडे जाणारी एक लेन बंद ठेवण्यात आली आहे. एक्सप्रेस वेवरील दरडप्रवण क्षेत्रातील खंडाळा एक्झिट ते खंडाळा बोगदा, अमृतांजन पूल, आडोशी बोगदा, भातन बोगदा येथील एकूण दोन किलोमीटर अंतरावरील धोकादायक सैल दरडी हटविणे व संरक्षक जाळ्या बसविण्यात येणार असून, या दरड हटाव मोहिमेचा कालावधी दीड वर्षाचा आहे. या कामासाठी अंदाजे ६५ कोटी खर्च अपेक्षित असल्याचे रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाºयांनी सांगितले.दोन वर्षांपूर्वी २२ जून व १९ जुलै २०१५ रोजी पुणे मुंबई एक्सप्रेस वरील खंडाळा (बोरघाट) घाटातील खंडाळा व आडोशी बोगद्याच्या तोंडाजवळ मोठ्या दरडी कोसळल्या होत्या. दरडीच्या या नैसर्गिक दुर्घटनेत आडोशी बोगदा येथे तीन प्रवाशांचा मृत्यू झाला होता, तर पाच प्रवासी गंभीर जखमी झाले होते. आडोशी बोगद्याच्या दरडीच्या अगोदर २२ जूनला खंडाळा बोगद्याजवळही मोठी दरड कोसळली होती. या घटनेत दोन वाहनांची नुकसान वगळता कोणतीही जीवितहानी झाली नव्हती, दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले होते. या दोन्ही घटनेसह अवघ्या दीड महिन्यात खंडाळा घाटातील खंडाळा एक्झिट ते आडोशी बोगद्या पर्यंतच्या आठ किलोमीटर अंतरावर पाचवेळा दरडीच्या घटना घडल्या होत्या. यामुळे घाटमाथा परिसरात एक्सप्रेस वेवरून प्रवास करणे धोकादायक बनले होते. खंडाळा घाटातील आठ किलोमीटर अंतरावरील दरडप्रवण क्षेत्रात कोणत्याही क्षणी दरड कोसळेल अशी भीती प्रवाशांमध्ये पसरल्याने यामार्गावरून प्रवास करणे असुरक्षित बनले होते. सातत्याने कोसळणा?्या दरडीमुळे एक्सप्रेस वेवरील वाहतूक अनेक दिवस विस्कळीत झाली होती. त्यानुसार घाटमाथा परिसरातील डोंगर पठारावरील अत्यंत धोकादायक दरडीच्या ठिकाणांची भूवैज्ञानिक तज्ज्ञांच्या मार्फत पाहणी केली होती. त्यांच्या पाहणी अहवालानुसार खंडाळा एक्झिट ते आडोशी बोगद्या पर्यंतच्या आठ किलोमीटर अंतरावरील एकूण आठ ठिकाणे निश्चित करण्यात आली होती. या आठ ठिकाणी सैल झालेल्या दरडी व त्या ठिकाणी पुन्हा दरडी कोसळू नये यासाठी डोंगर पठारावर संरक्षक जाळ्या बसविण्याच्या कामाला गतवर्षी २७ जुलै २०१६ रोजी सुरुवात करण्यात होती. या कामाला एक वर्षापेक्षा अधिक कालावधी लागला आहे. त्याकामासाठी सुमारे ५२ कोटी खर्च करण्यात आला आहे. हे काम मेकाफेरी कंपनीने स्पॅनिश व इटलीच्या तज्ज्ञ कामगारांच्या मदतीने पूर्ण केले आहे. मात्र तंज्ञाना निश्चित केलेल्या ठिकाणा शिवाय इतर ठिकाणी दरडीचा धोका निर्माण झाला असल्याचे निदर्शनास आल्याने त्याबाबत उपाययोजना राबविण्या संदर्भात संबंधितांनी सूचित केले होते. त्यानुसार एक्सप्रेस वेवरील घाटमाथा परीसरातील दरडप्रवण क्षेत्रातील धोकादायक सैल दरडी हटविणे व संरक्षक जाळ्या बसविण्याच्या मोहिमेला पुन्हा सुरुवात झाली आहे. यामध्ये चार ठिकाणावरील सैल झालेल्या दरडी हटविणे व त्या ठिकाणी संरक्षक जाळ्या बसविण्यात येणार आहे. याकामासाठी सुमारे ६५ कोटी रुपये खर्च होणार असून, पायोनिअर फाऊंडेशन इंजिनिअर प्रा. लिमिटेड ही कंपनी सदरचे काम करत आहे.
कामादरम्यान प्रवाशांनी सहकार्य करावे : प्रशांत औटी पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवरील दरडप्रवण क्षेत्रात धोकादायक दरडी हटविणे व संरक्षक जाळ्या बसविण्याच्या कामाला रस्तेविकास महामंडळाच्या वतीने सुरुवात करण्यात आली आहे. कामादरम्यान सुरक्षेसाठी कामाच्या ठिकाणची एक लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे. जसजसे काम होईल, तशी बंद करण्यात आलेली लेन पुन्हा वाहतुकीसाठी खुली करण्यात येईल. कामाच्यावेळी होणा?्या गैरसोयी बद्दल प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन रस्ते विकास महामंडळाचे अधिक्षक अभियंता प्रशांत औटी यांनी केले आहे.