पिंपरी : अवैध वृक्षतोडप्रकरणी गेल्या सहा महिन्यांत महापालिकेकडून ३८ जणांना नोटीस दिली आहे तर ४६ लाख १० हजार रुपये दंड वसूल केला. शहरातील दिवसेंदिवस झाडतोडीच्या घटना वाढत आहेत. मात्र, तक्रार केली तरच त्यांच्यावर महापालिकेकडून फक्त नोटीस काढण्यात येते. त्यांच्यावर ना गुन्हा दाखल होतो ना कसली कारवाई, अवैध वृक्षतोड करणाऱ्या पुष्पावर अंकुश कधी लागणार? असा सवाल पर्यावरणप्रेमी विचारत आहेत.
मागील महिन्यांत आकुर्डीमधील एका कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावर विनापरवाना अवैध वृक्षतोड करण्यात आली. या वृक्षतोडीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडूनच बेकायदेशीर ग्रीन सिग्नल दिला होता, अशी दबक्या आवाजात चर्चा होती शिवाय या ठिकाणहून वृक्षतोड करून झाडे वाहतूक करण्यासाठी १० ते १२ मोठ्या गाड्या व ट्रेलर वापरण्यात आली असल्याची चर्चा होती. प्रकार उघडकीस आल्यावर महापालिकेने ४५ लाखांचा दंड त्यांना ठोठावला होता.
अधिकारी-ठेकेदार मिलीभगत
पिंपरी -चिंचवड शहरात अनेक ठिकाणी वृक्ष छटाईच्या नावावर मोठ्या प्रमाणावर विनापरवाना वृक्षतोड केली जात आहे. अनेक ठिकाणी कारवाई केली जात नाही. खूपच पाठपुरावा केला, तर नावापुरती कारवाई केली जाते. राजकीय पुढारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मर्जीने अतिशय पद्धतशीरपणे उद्यान विभागातील अधिकारी सुपारी घेऊन झाडांची कत्तल करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
शहरात अवैध वृक्षतोड व छाटणी केली जात आहे. याबाबत महापालिकेच्या उद्यान विभागाकडे गेल्या दोन वर्षांपासून तक्रार केली जात आहे. मात्र, वृक्षतोड व छाटणीचे प्रकार वाढतच आहेत. असे प्रकार विशेषतः रात्री घडत आहेत. याबाबत उद्यान विभागाकडून केवळ पंचनामा केला जातो. त्यातही तोडलेल्या वृक्षांची संख्या व छाटणीचे प्रमाण बघितले जाते. मात्र, त्यांच्यावर कठोर कारवाई होत नाही.
- राहुल घोलप, पर्यावरणप्रेमी
उद्यान विभागांकडून ३८ जणांना नोटीस दिल्या आहेत. वृक्षतोड करणा-यांना नोटीस दिल्यानंतर दंड वसुलीची कारवाई सुरू होते. त्यातील काही प्रकरणे न्यायप्रविष्टही आहेत.
-गोरख गोसावी, उद्यान अधीक्षक, महापालिका