ज्ञानेश्वर भंडारे, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी : शहरातील जलशुध्दीकरण केंद्रातील फिल्टर मशीन बंद असल्याचा खोटे 'एसएमएस', सोशल मीडिया करणाऱ्यांवर महापालिकेने गुन्हा दाखल केला आहे. याबाबत महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे यांनी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच नागरिकांनी खोट्या खोट्या मेसेजवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राकडून करण्यात आले आहे.
दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, महापालिकेतर्फे सर्वांना विनंती आहे की पाणी गरम करून प्यावे. जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर मशीन बिघाड झाल्याने येत्या ३ किंवा ४ दिवसांत कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे महापालिकेतर्फे पाणी फिल्टर न करता सोडण्यात येणार आहे. कृपया ही माहिती आपल्या सर्व मित्र परिवाराला कळवावी आणि आपण पण काळजी घ्यावी, अशा स्वरुपाचा संदेश व्हाटसॲपवर व्हायरल करण्यात आला आहे. असे महापालिकेने कोणतेही प्रसिध्दीपत्रक काढलेले नाही. अफवा पसरवण्याच्या उद्देशानेच हा मॅॅसेज व्हायरल केला असून त्यात तथ्यता नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.