पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मतदार जनजागृती केली होती. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत १० टक्क्यांनी वाढ झाली होती. महापालिकेने राबविलेला मतदार जागृतीचा पिंपरी पॅटर्न सर्वत्र राबवावा, अशा सूचना आयोगाने दिल्या होत्या. त्यानुसार तयार केलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते झाले. मतदार प्रबोधनाचा पिंपरी पॅटर्न सर्व निवडणुकांत वापरला जाणार आहे.मुंबई विद्यापीठात राज्य निवडणूक आयोग, राज्य शासनाचा ग्रामविकास विभाग, मुंबई विद्यापीठ आणि पुणे येथील गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेमार्फत ‘७३ व ७४ व्या घटना दुरुस्तीची पंचवीस वर्षे : प्रगती आणि भावी वाटचाल’ या विषयावर परिषद झाली. त्यास राज्यपाल उपस्थित होते. या वेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राबविण्यात आलेल्या मतदार जनजागृती विषयक माहिती व निवडणूक कार्यप्रणालीच्या पुस्तिकांचे प्रकाशन झाले. ग्र्रामविकास व महिला बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे, राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया, आयुक्त श्रावण हर्डीकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे, केंद्रीय पंचायतराज विभागाचे निवृत्त सहसचिव टी. आर. रघुनंदन, ग्रामविकास खात्याचे सचिव असीम गुप्ता, सचिव शेखर चेन्ने, सहायक आयुक्त अण्णा बोदडे, जगदीश मोरे आदी उपस्थित होते.पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मतदार जनजागृती करण्यात आली होती. २०१२च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ५४ टक्के मतदान झाले होते.महापालिका निवडणूकीत मतदानाची टक्केवारी ६५.३५ वर पोहोचली. दहा टक्के वाढ झाली होती. मार्गदर्शकपुस्तिका करण्याच्या सूचना आयोगातर्फे देण्यात आल्या होत्या. त्यानुसार मतदार जनजागृती व कार्यप्रणालीच्या पुस्तिका तयार केल्या. या पुस्तिका राज्यभर वाटण्यात येणार आहेत. आपण केलेल्या प्रयत्नांची दखल आयोगाने घेतली. - श्रावण हर्डीकर,आयुक्त, महापालिका
महापालिकेने राबविलेला मतदार जागृतीचा पिंपरी पॅटर्न सर्वत्र राबवावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2017 4:14 AM