पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर परिवर्तनासाठी (सिटी ट्रान्स्फॉर्मेशन आॅफिस) पहिला टप्पा सर्वेक्षण आणि नागरिकांची मते नोंदविण्याचे नियोजन केले होते. परिवर्तनाची जबाबदारी सोपविलेल्या संस्थेने सर्वेक्षणासाठी महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि खासगी संस्थांनाच जुंपले होते. पंधरा हजार अर्ज भरून घेतले आहेत. विशेष बाब म्हणजे सर्वेक्षणावर प्रत्येक अर्ज पंधरा रुपये असा सुमारे पंधरा लाखांचा खर्चही स्थायी समितीकडून मंजूर करून घेतला आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेचा स्मार्ट सिटीत समावेश झाला आहे. मात्र, स्मार्ट सिटी आणि सिटी ट्रान्स्फॉर्मेशन आॅफिस या दोन्हीही बाबी वेगळ्या असल्याचा खुलासा महापालिकेने केला आहे. शहर परिवर्तनासाठी महापालिकेच्या वतीने पॅलीडीयम संस्थेची नियुक्ती केली आहे. सुरुवातीला दोन वर्षांसाठी आणि आवश्यकता वाटल्यास आणखी एक वर्ष वाढवून तीन वर्षांसाठी काम देण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. शहर परिवर्तनाचा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण होणार आहे तो म्हणजे, सर्वेक्षणाचा. महापालिकेच्या संकेतस्थळावर सिटी ट्रान्स्फॉर्मेशन साठी सर्वेक्षण अर्ज उपलब्ध करून दिले आहेत. त्यात चुकांचा भरणा आहे. तसेच सर्वेक्षण अधिक सकस होण्याच्या दृष्टीने प्रयत्न न केल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावर फॉर्म उपलब्ध आहे. मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये आहेत. मात्र, त्यात चुकाच चुका असल्याचे दिसून येत आहे.अर्ज सदोष, शुद्धलेखनाच्या चुकासर्वेक्षणासाठी शाश्वत वाहतूक, पाणी, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सेवा, शिक्षण, हरित शहर, पर्यटन आणि संस्कृती, क्रीडा, सुरक्षा, आपत्कालीन सेवा, ई-गव्हर्नन्स, शहराची ओळख, आर्थिक प्रगती अशा विविध विषयांवर प्रश्न विचारले गेले आहेत. शाश्वत वाहतुकीसंदर्भातील प्रश्न विचारले आहेत. मराठी अर्जात इंग्रजी शब्द वापरले आहेत. तसेच शुद्धलेखनाच्याही चुका अधिक आहेत. संशोधनातील तथ्यांचे किंवा गृहीतकांची मांडणी करताना प्रश्नावली महत्त्वाची असते. संशोधनासाठी सर्वंकष आणि निर्दोष प्रश्नावली आवश्यक असते. शहर परिवर्तनासाठी ती प्रश्नावली तयार केलेली नसल्याचे दिसून येते. अत्यंत घाई-घाईने अर्ज तयार केल्याचे दिसून येते. शहरात गाडी पार्क करणे, व्यवस्थित राखणे, आॅन डिमाण्ड कचरा, घरात आणि फ्लॅटमध्ये, पाणी अनेकदा शुद्ध असते, अशा अनेक चुका आहेत. महापालिकेच्या अर्जावर एका युवा व महिला व्यासपीठाचा उल्लेख केला होता. ही बाब प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर अर्जात बदल केला आहे.अर्ज भरण्यासाठी पंधरा लाखांचा खर्चपरिवर्तनाच्या कामासाठी सर्वेक्षणास अधिकारी जुपंले आहेत. भविष्याचा वेध म्हणून मिरविणाऱ्या एका वर्तमान पत्राच्या महिला व्यासपीठ आणि तरूणांच्या व्यासपीठाचा वापर केला असून त्यांना अर्ज भरण्याचे टार्गेट दिले आहे. त्यामुळे सर्वेक्षणाची अचूकता किती असेल असा प्रश्न निर्माण होत आहे. यास साह्यभूत व्हावे म्हणून आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महापालिकेतील कर्मचाºयांना, अधिकाºयांनाही अर्ज भरून देण्याबाबत तोंडी आदेश दिले होते. त्यासाठी पंधरा लाख खर्चाचा विषय स्थायी समितीने मंजूर केला होता.ऐतिहासिक वास्तू अन् क्रीडा प्रकारांचा विसरआपण कोणत्या क्रीडा प्रकार आपण वापरता असा प्रश्न आणि त्यात पिंपरी-चिंचवडची वैभवी कुस्ती आणि कबड्डी या खेळांचा उल्लेख नाही. पिंपरी-चिंचवडमध्ये खालीलपैकी कोणती पर्यटन स्थळे आहेत. असा प्रश्न आहे. उत्तरात मोरया गोसावी मंदिर, भक्तीशक्ती, बर्डव्हॅली आणि अप्पूघर, सायन्स पार्क, बहिणाबाई चौधरी उद्यान आणि प्रतिशिर्डी साईबाबा मंदिर असा उल्लेख आहे. त्यात क्रांतीवीर चापेकर स्मारक, मंगलमूर्ती वाडा, गर्व्हनर बंगला, थेरगाव बोटक्लब, सांगवीतील शिवसृष्टी, भोसरीतील शिवसृष्टी आदींचा उल्लेख नसल्याचे दिसून येते.सहा महिन्यांत दिले पाच कोटीजानेवारीत पॅलीडीएमला प्रत्यक्ष कामाचा आदेश देण्यात आला. गेल्या सात महिन्यात नागरिकांचे सर्वेक्षण करणे, केवळ अर्ज भरून घेणे आणि प्रकल्पांची माहिती संकलीत करण्याचे काम केले गेले आहे. मार्च अखेरीपर्यंत ४८ लाख ३६ हजार ३४८ रूपये दिले आहेत. तसेच मे अखेरपर्यंत त्यासाठी संस्थेला ४ कोटी १ लाख ६४ हजार ७४९ रूपये दिले आहेत. अर्थात सल्लागार संस्थेला पोसण्याचे काम महापालिका करीत आहे. शहरपरिवर्तनासाठी महापालिकेच्या खर्चाने अधिकारी आणि पदाधिकाºयांची दोन दिवस पर्यटन घडवून आणले.
खासगी संस्थेच्या सर्वेक्षणास जुंपले महापालिकेचे अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 3:51 AM