पिंपरी : शहरातील नागरिकांना इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका २० ठिकाणी ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. प्रशासक राजेश पाटील यांनी या विषयाला मंजुरी दिली. ‘बांधा आणि संचलित करा’ या तत्त्वावर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेला कोणताही खर्च करावा लागणार नाही. महापालिकेकडून संबंधित एजन्सीला केवळ जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ धोरणांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर अपारंपरिक ऊर्जेच्या निर्मितीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रमास चालना मिळण्याकरिता विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या कामी महापालिकेमार्फत ईव्ही चार्जिंग स्टेशन ७ वर्षे कालावधीकरिता २० ठिकाणी ‘स्वत: बांधा आणि संचलित करा’ या मॉडेलवर इलेक्ट्रिक वाहने चार्जिंगची सुविधा कमी दराने उपलब्ध करून दिली आहे. या एजन्सींना महापालिकेकडून फक्त जागा उपलब्ध करून देण्यात येईल. या जागेवर सात वर्षांकरिता देखभाल करणे या बाबी एजन्सीने करणे आवश्यक राहील.
ग्राहकांसाठीच्या कमाल मर्यादा दराप्रमाणे प्रतियुनिट १७ रुपये अधिक सेवावस्तू कर अशी रक्कम ही एजन्सी चार्जिंग फी म्हणून ग्राहकांकडून वसूल करू शकते. अटी, शर्तींमध्ये नमूद केल्यानुसार वीज वितरण कंपनीच्या विद्युत शुल्कात वाढ अगर घट झाल्यास त्यानुसार ग्राहकांकडून रक्कम एजन्सीला वसूल करता येणार आहे.
अशी आहेत चार्जिंग स्टेशन
पिंपरी येथील महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात, पिंपरीतील सीट्रस हॉटेलजवळ, दुर्गादेवी टेकडी - निगडी, वाहतूकनगरी, बर्ड व्हॅली - संभाजीनगर, बजाज ऑटोजवळ, आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल - भोसरी, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम - नेहरूनगर, मलनिस्सारण केंद्र - चिखली, राधास्वामी रोड - चिखली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलाव - कासारवाडी, निसर्गनिर्माण सोसायटी, रिलायन्स मार्टजवळ, कोकणे चौक- पिंपळे सौदागर, विंटेज सोसायटी - पिंपळे सौदागर, योगा पार्क, विबग्योर शाळा- पिंपळे सौदागर, राजमाता जिजामाता उद्यान- पिंपळेगुरव, वंडर कार्स, निसर्ग निर्माण सोसायटी - कोकणे चौक, पिंपळे सौदागर, भक्ती शक्ती बस टर्मिनल - निगडी, एच ए कंपनी सबवेजवळ, सीएमई सीमाभिंतीलगत -फुगेवाडी आणि संत तुकाराम मेट्रो स्टेशनच्या चौथ्या प्रवेशद्वाराजवळ ईव्ही चार्जिंगसाठी जागानिश्चिती केली आहे.