पिंपरी : अधिकारी, कर्मचारी कुटुंबीयांसाठी असणारी धन्वंतरी स्वास्थ्य योजना बंद करण्यात येणार असून, अधिकारी, कर्मचाºयांचा वैद्यकीय विमा काढला जाणार आहे. त्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली असून, सर्वसाधारण सभेने मान्यता दिली आहे.
महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी तसेच कुटुंब व्याख्येनुसार, त्यांच्यावर अवलंबून असणारे कुटुंबीय आणि सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी धन्वंतरी स्वास्थ्य योजना १ सप्टेंबर २०१५ पासून सुरू केली होती. त्यासाठी धोरणही तयार केले. योजना सुरू झाल्यानंतर कर्मचारी आणि त्यांचे नातेवाईक धन्वंतरी योजनेच्या पॅनलवरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. कुटुंब व्याख्येनुसार कर्मचारी, त्याची आई, वडील, दोन मुले अशा पाच व्यक्तींचा समावेश कर्मचाºयांच्या अवलंबितांमध्ये केला आहे. या योजनेसाठी सेवेत कार्यरत असणाºया अधिकारी, कर्मचाºयांकडून ३०० रुपये इतका स्वहिस्सा आणि सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाºयांकडून १५० रुपये स्वहिस्सा जमा केला जातो. जमा होणाºया हिश्श्याच्या दुप्पट रक्कम पालिका धन्वंतरी निधीत जमा करते. या योजनेंतर्गत खासगी रुग्णालयांसमवेत करारनामा आहे.
धन्वंतरी स्थास्थ्य योजनेच्या धर्तीवरच वैद्यकीय विमा योजना आहे. निविदनाद्वारे इन्शुरन्स कंपनीची निवड होणार आहे. धन्वंतरी स्वास्थ्य योजनेंतर्गत एका अधिकारी, कर्मचाºयाकरिता वार्षिक २० लाख रुपये इतकी खर्च मर्यादा निश्चित केली होती. आजाराच्या स्वरूपानुसार हीच मर्यादा २० लाखांपर्यंत वाढेल. याकरिता १० कोटी इतक्या रकमेचा बफर निश्चित केला जाणार आहे.
धन्वंतरी स्वास्थ्य योजनेतील आजार, उपचरांचा समावेश यात केला आहे. त्याचप्रमाणे दुर्धर आजारांचाही समावेश असणार आहे. धन्वंतरीतील ९३ रुग्णालयांसह संपूर्ण देशातील सहा हजार रुग्णालयांचा समावेश असेल. त्यामुळे दुर्धर आजारावरील राज्याबाहेर उपलब्ध असणारे उपचार घेणेही महापालिका कर्मचाºयांना शक्य होणार आहे.धन्वंतरी योजना सुरू झाल्यापासून आॅक्टोबर २०१५ ते जानेवारी २०१९ अखेर ६० कोटी ९३ लाख रुपये इतक्या रकमेच्या बिलांची पूर्तता केली आहे. या योजनेत सध्या एकूण ९३ रुग्णालयांचा समावेश आहे. अंदाजित केलेल्या रकमेपेक्षा कितीतरी पटीने जास्त रक्कम यावर खर्च होत आहे. तसेच या योजनेंतर्गत रुग्णालयांची ९३ संख्याही मर्यादित असल्याने काही वेळेस आपत्कालीन परिस्थितीत उपचार घेण्याकरिता अडचणी निर्माण होतात. त्यामुळे धन्वंतरी योजनेऐवजी खासगी विमा ब्रोकरची नेमणूक करून वैद्यकीय विमा उतरविण्याबाबत निश्चित केले.