पिंपरी : तत्कालीन आयुक्त दिनेश वाघमारे आणि प्रशासकीय अनास्थेमुळे देशपातळीवर घेण्यात आलेल्या स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड महापालिका पिछाडीवर गेले आहे. गेल्या वर्षी देशात नवव्या आणि राज्यात पहिल्या असणाऱ्या शहराला देशात ७२ वा आणि राज्यात पाचवा क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारताचा नारा दिलेला आहे. स्वच्छ शहरांना प्रोत्साहान देण्यासाठी टॉप टेनमध्ये आलेल्या पालिकांचा गौरव करण्यात येतो. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाच्या यादीतील टॉप टेनमध्ये शहराचा देशात नववा क्रमांक आला होता. त्यामुळे स्वच्छतेबाबतच्या पिंपरी-चिंचवड पॅटर्नचा अभ्यास इतर शहरांनी केला होता. या स्पर्धेत एकूण साडेचारशे शहरे सहभागी झाली होती. स्वच्छ भारत आभियानात स्वच्छ भारत पुरस्कार सोहळ्याचे गुरुवारी नवी दिल्लीत वितरण झाले. यामध्ये महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकावर नवी मुंबई शहर आले असून, पिंपरी-चिंचवड पिछाडीवर गेले आहे. महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी गेल्या वर्षी योग्य नियोजन केल्याने स्वच्छ शहरासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत पिंपरी-चिंचवडने राज्यात मुसंडी मारली होती. मात्र, काही महिन्यांपूर्वी या अभियानाचे पथक आले. त्या वेळी महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू होती. प्रभागरचना आणि निवडणूक कामात व्यस्त असणाऱ्या महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे आणि प्रशासनाने याविषयी गांभीर्याने नियोजन केले नाही. परिणामी हागणदारी मुक्त आणि नागरिकांच्या तक्रारींसाठी तयार केलेल्या ‘अॅप’कडे दुर्लक्ष झाल्याने गुण कमी मिळाले. दरम्यानच्या कालखंडात डॉ. यशवंत माने यांच्यावर निवडणुकीसह आरोग्य विभागाची जबाबदारी होती. स्वच्छता विभागासाठी स्वतंत्र अधिकारी नव्हता. परिणामी गुणांमध्ये घट झाली. (प्रतिनिधी)गुणांक झाले कमी स्वच्छ स्पर्धेबाबत लक्ष न दिल्याने गुणांकनात शहर पिछाडीवर गेले आहे. त्यामुळे देशातील टॉप टेनची पंरपरा खंडित झाली आहे. गेल्या वर्षी झालेल्या स्पर्धेत दोन हजार गुणांपैकी १७०० गुण मिळवून महापालिकेचा देशात पहिल्या नऊ शहरांमध्ये नंबर आला होता. या वर्षी झालेल्या स्पर्धेत १३२० गुण मिळाले आहेत. ३८० गुणांनी शहर पिछाडीवर गेले आहे. हागणदारी मुक्त आणि उपाययोजनांसाठी दीडशे गुण होते. तसेच स्वच्छतेविषयीच्या राबविण्यात येणाऱ्या अॅप संदर्भातील उपाययोजना यासही गुण होते. या दोन्ही गोष्टीत महापालिकेला गुण मिळालेले नाहीत.
अनास्थेमुळे महापालिकेची पिछाडी
By admin | Published: May 05, 2017 2:51 AM