पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे वर्ग एक आणि वर्ग दोनचे अधिकारी महापालिका सभा, स्थायी समिती, विधी समिती सभेवेळी आणि विशेष प्रसंगी गडद निळ्या रंगाची पँट आणि फिकट आकाशी रंगाचा शर्ट परिधान करणार आहेत. आयुक्त दिनेश वाघमारे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. महापालिका सभा, स्थायी समिती सभेच्या दिवशी, तसेच उच्चस्तरीय शिष्टमंडळाच्या महापालिका भेटीवेळी वर्ग एक आणि वर्ग दोनचे अधिकारी एकसारख्याच पोशाखात असावेत, असा निर्णय तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी २०१३ मध्ये घेतला होता. तथापि, त्यांच्या बदलीनंतर अधिकाऱ्यांनी गणवेशसक्ती धुडकावून लावली. तत्कालीन आयुक्त राजीव जाधव आणि विद्यमान आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या राजवटीत अधिकारी गणवेशात येत नव्हते. या पार्श्वभूमीवर स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांनी शिस्तीचा बडगा उचलला. सभांच्या वेळी, तसेच आयुक्तांच्या आदेशानुसार निर्धारित बैठकांच्या वेळी गणवेश परिधान करावा, असे निर्देश त्यांनी दिले. १२ एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी करण्याचेही फर्मान त्यांनी सोडले. त्यानुसार स्थायी समिती सभांपासून २०८ अधिकाऱ्यांना गणवेश घालावा लागणार आहे.(प्रतिनिधी)
पालिका अधिकारी आजपासून गणवेशात
By admin | Published: April 12, 2017 4:06 AM