पिंपरी : भोसरी मधील धावडेवस्ती येथे एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून दगडाने ठेचून खून केल्याचा प्रकार २७ जानेवारी रोजी उघडकीस आला. या गुन्ह्यातील आरोपींना दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी याबाबत माहिती दिली.
नामदेव शिवाजी शिंदे (वय २४, धावडे वस्ती, भोसरी. मूळ रा. याकतपुर, ता. औसा, जि. लातूर), भारत उर्फ बारक्या भीमराव आडे (वय २२, रा. धावडे वस्ती, भोसरी), आकाश अशोक सरदार (वय २४, रा. नाणेकरवाडी, चाकण), लक्ष्मण राजू नागोले (रा. धावडे वस्ती, भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. गणेश शिवाजी गडकर (रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी. मूळ रा. टाका, पो. औसा, ता. जि. लातूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपींनी तरुणाचा खून करून गॅरेजमध्ये फेकल्याची कबुली आरोपींनी दिली.
२७ जानेवारी रोजी धावडे वस्ती भोसरी येथे एका तरुणाचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली. नामदेव शिंदे याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने त्याच्या तीन साथीदारांसोबत मिळून गणेश गडकर याचा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या तीन साथीदारांना देखील अटक केली आहे. आरोपी नामदेव शिंदे आणि मयत गणेश गडकर हे मित्र असून नामदेव याच्या मोबाईल मध्ये गणेशचे फोटो तसेच सेल्फी देखील पोलिसांना आढळून आली आहे. आरोपी आणि मयत हे एकाच जिल्ह्यातील आहेत. गणेश याचा काटा काढण्याच्या उद्देशाने नामदेव याने त्याला २७ जानेवारी रोजी रात्री अकरा वाजता जनता गॅरेज जवळ बोलावून घेतले. तिथे त्यांचा एकमेकांसोबत वाद घातला. त्या चौघांनी मिळून गणेशला जमिनीवर पाडून त्याच्या डोक्यात दगड घालून डोके दगडाने ठेचून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने गणेशचा मृतदेह तब्बल ४० फूट फरफटत नेऊन गॅरेजमधील दोन गाड्यांच्या मध्ये फेकून दिला.