लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : घराचा पत्रा वाजविल्यावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून लाकडी दांडक्याने मारहाण करून तरुणाला गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला. खूनप्रकरणी गुन्हा दाखल करून दोन संशयितांना देहूरोड पोलिसांनी अटक केली. अमोदकुमार मोहित यादव (२४), असे खून झालेल्याचे नाव आहे. त्याचा भाऊ प्रमोद मोहित यादव (रा. विठ्ठलवाडी, तळवडे रुग्णालयाजवळ) यांनी याप्रकरणी २ नोव्हेंबर रोजी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भोगेंद्रकुमार जोखन सदाय (२३, रा. सणसवाडी, शिक्रापूर, मूळगाव गंगापूर, ता. नखरुड, जि. मधुबनी, बिहार), जयप्रकाश रामकिसन सदाय (१९, रा. हांडेवाडी, कात्रज, पुणे, मूळगाव गंगापूर, ता. नखरुड, जि. मधुबनी, बिहार), अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोदकुमार हा त्याच्या मित्रांसोबत असताना जयप्रकाश व भोगेंद्रकुमार यांनी घराचा पत्रा वाजविल्याने भांडण झाले. त्या भांडणाचा राग मनात धरून दोघांनी अमोदकुमार याला लाकडी दांडक्याने डोक्यात व पाठीत मारहाण करून जखमी केले. त्यानंतर उपचारादरम्यान अमोदकुमार याचा मृत्यू झाला. खूनप्रकरणी गुन्हा दाखल करून देहूरोड पोलिसांनी संशयितांचा शोध घेतला. त्यावेळी भोगेंद्रकुमार हा शिक्रापूर येथे पळून गेल्याची माहिती पोलिस हवालदार किरण खेडकर यांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी वेशांतर करून भोगेंद्रकुमार याला दोन तासांत शिक्रापूर येथून ताब्यात घेतले. तसेच जयप्रकाश हा त्याच्या मूळगावी बिहार येथे पळून जात असल्याबाबत पोलिस अंमलदार केतन कानगुडे यांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांचे पथक जयप्रकाश याच्या मागावर होते. दरम्यान, तो खेड शिवापूर येथून मुंबईमधून कुर्ला येथून रेल्वेने पळून जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, भुसावळ रेल्वे स्थानक येथून त्याला ताब्यात घेतले. भोगेंद्रकुमार आणि जयप्रकाश यांना शुक्रवारपर्यंत (दि. ८) पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली देहूरोड पोलिसांनी ही कामगिरी केली.