पिंपरी : बीडमधील माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथून रोजगाराच्या शोधात पुण्यात आलेल्या तरुणाचा खून करण्यात आला. बालाजी ऊर्फ बाळू मंचक लांडे (वय २८) असे मृत तरुणाचे नाव आहे. बालाजीला शुक्रवारी (दि. १७) पिंपरीमधील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात गंभीर जखमी अवस्थेत दाखल करून दोघांनी पळ काढला होता. त्या दोघांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने अटक केली.
दिनेश सूर्यकांत उपादे (२८, रा. पिंपळे निलख), आदित्य शरद शिंदे (२५, रा. निगडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या तीन साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत.
माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील बालाजी लांडे रोजगाराच्या शोधात पुण्याला जात असल्याचे आईला सांगून १६ जानेवारीला निघाला होता. १७ जानेवारीच्या दुपारपासून त्याचा मोबाइल बंद होऊन तो बेपत्ता झाला. यामुळे नातेवाइकांनी त्याचा शोध सुरू केला. दरम्यान, त्याच रात्री पिंपरीतील वायसीएम रुग्णालयामध्ये गंभीर जखमी अवस्थेतील त्याला उपचारासाठी दोघांनी दाखल केले. त्याच्या संपूर्ण अंगावर, डोक्यावर मारहाणीच्या गंभीर जखमा आढळून आल्या. दाखल केल्यानंतर दोघेजण पळून गेले. दाखल करणाऱ्या दोघांनी नावे खोटी सांगितली होती. उपचारापूर्वीच बालाजीचा मृत्यू झाला.
बालाजी लांडे शुक्रवारपासून बेपत्ता होता. त्याचा चुलतभाऊ परशुराम विलास लांडे पुण्यात त्याचा शोध घेत होता. दरम्यान, त्याने सोमवारी पोलिसांच्या पोर्टलवर ऑनलाइन मिसिंगची तक्रार दाखल केली. तासाभरात परशुराम यास पिंपरी-चिंचवड क्राईम ब्रँचने संपर्क साधला. वायसीएम रुग्णालयात त्याला बोलावून घेऊन मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. बालाजीला रुग्णालयात दाखल केलेल्या दोघांना अटक केली आहे.
रक्ताच्या डागावरून शोध
बालाजी पिंपरी-चिंचवड शहरातील घरकुल चिखली येथे गेल्याची माहिती मिळाल्याने गुंडाविरोधी पथकाने घरकुल येथे जाऊन तपास सुरू केला. एका लिफ्टमध्ये रक्ताचे डाग दिसले. त्यावरून पोलिसांनी चौकशी करत या गुन्ह्याचा छडा लावला. संशयितांना चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.