पिंपरी : टेम्पो लावण्याच्या कारणावरून दोन जणांनी भांडण काढून शिवीगाळ केली. तसेच डोक्यात दगड मारून एकाचा खून केला. तर एकाला मारहाण करून जखमी केले. जाधववाडी, चिखली येथे गुरुवारी (दि. २४) रात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर फरार झालेल्या दोन आरोपींना पोलिसांनी शिताफीने अटक केली. गुन्हे शाखा युनिट एक तसेच चिखली पोलिसांनी ही कारवाई केली.
पंडित किसन गायकवाड (वय ५६), असे खून झालेल्याचे नाव आहे. सुरेश अंबिका पटेल (वय २७, रा. जाधववाडी), असे जखमी झालेल्याचे नाव आहे. सुरेश नवनाथ राऊत (वय २२), दीपक प्रदीप पाचपिंडे (वय २२, दोघेही रा. जाधववाडी), असे अटक केलेल्यांची नावे आहेत. मयत पंडित गायकवाड यांचा मुलगा नवनाथ पंडित गायकवाड (वय २९, रा. जाधववाडी) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत पंडित गायकवाड आणि सुरेश पटेल यांची ओळख होती. सुरेश पटेल यांनी त्यांच्याकडे असलेला टेम्पो बुधवारी (दि. २३) रात्री जाधववाडी येथील तळई गार्डन समोरील रस्त्यावर पार्क केला होता. पंडित गायकवाड आणि सुरेश पटेल हे दोघेही बुधवारी रात्री नऊच्या सुमारास त्या टेम्पोमध्ये झोपण्यासाठी गेले. रात्री दीडच्या सुमारास आरोपी तेथे गेले. टेम्पो लावण्याच्या कारणावरून आरोपींनी पंडित गायकवाड व सुरेश पटेल यांच्या सोबत भांडण काढून शिवीगाळ केली. लाकडी दांडक्याने मारहाण करून पटेल यांना जखमी केले. पंडित गायकवाड यांना डोक्यात व तोंडावर दगडाने मारून ठार केले. त्यानंतर आरोपी पळून गेले. याप्रकरणी तपास चक्रे फिरवून तांत्रिक विश्लेषण करून पोलिसांनी आरोपींना अटक केली.
चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक वसंत बाबर, उपनिरीक्षक विवेक कुमटकर, किरण कणसे, सचिन देशमुख, पोलीस कर्मचारी बाबासाहेब गर्जे, सुनील शिंदे, कबीर पिंजारी, युनिट एकचे कर्मचारी प्रमोद गर्जे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.