पिंपरी : गॅरेजमध्ये आलेल्या तरुणाला चोरीच्या संशयावरून हत्याराने हातावर, पायावर व डोक्यावर मारून गंभीर जखमी केले. यात तरुणाचा मृत्यू झाला. कासारवाडी मेट्रो स्टेशनजवळ शनिवारी (दि. २३) सकाळी अकराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांना शुक्रवारपर्यंत (दि. २९) पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
गौतम कैलास सोनकांबळे (२८, रा. चिंचवड, मूळगाव मळज, ता. उमरगा, जि. धाराशिव) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. आसिफ इब्राहिम पटेल (२६, रा. कासारवाडी) आणि सादिक मियासाब शेख (२३, रा. पिंपळे गुरव) या दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली. मृत गौतम सोनकांबळे यांचा चुलत भाऊ शंकर सिद्धाराम कांबळे (३९, रा. दापोडी) यांनी याप्रकरणी रविवारी (दि. २४) भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांचे कासारवाडी मेट्रो स्टेशनजवळ गॅरेज आहे. या गॅरेजमधून गेल्या काही दिवसांपासून भुरट्या चोरीचे प्रकार होत होते. त्यामुळे संशयित पटेल आणि शेख यांनी पाळत ठेवली. दरम्यान, शनिवारी गौतम सोनकांबळे हा गॅरेजमध्ये आला. तो चोरी करण्यासाठी आला असल्याचा संशय आल्याने पटेल आणि शेख यांनी त्याला मारहाण केली. त्याच्या हातावर, पायावर व डोक्यावर हत्याराने मारून त्याला जखमी केले. यात सोनकांबळे याचा मृत्यू झाला.
कासारवाडी मेट्रो स्टेशन जवळील झाडाखाली सोनकांबळे याचा मृतदेह आढळून आला. याबाबत माहिती मिळताच भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खुनाचे कारण काय, कोणी खून केला असावा, याबाबत पोलिसांकडून शोध सुरू झाला. सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता त्यात पटेल आणि शेख यांनी सोनकांबळे याला मारहाण केल्याचे दिसून आले. त्यावरून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता शुक्रवारपर्यंत (दि. २९) पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक पद्मभूषण गायकवाड तपास करीत आहेत.
मृत गौतम सोनकांबळे हा गेल्या दोन ते तीन वर्षांपासून चिंचवड येथे राहत होता. मिळेल ते काम तो करायचा. त्याची पत्नी आणि मुले गावाकडे आहेत. दरम्यान, फिरत असताना गौतम सोनकांबळे हा कासारवाडी येथे आला होता. त्यावेळी त्याला मारहाण झाली.