पिंपरी: योगा प्रशिक्षक असलेल्या विवाहित महिलेने हाताची शीर कापून राहत्या घरात पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. सांगवी येथे सोमवारी (दि. २०) सकाळी सातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. ही हत्या आहे की, आत्महत्या, याबाबत प्रश्न उपस्थित होत असून, त्याबाबत तपास करून ‘फाॅरेन्सिक लॅब’कडून अहवाल मागविण्यात येईल, अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली.
विशाखा दीपक सोनकांबळे (वय ३७, रा. सांगवी), असे गळफास घेतलेल्या महिलेचे नाव आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाखा या त्यांचे पती दीपक तसेच दहा वर्षांचा मुलगा व सहा वर्षांची मुलगी यांच्यासोबत सांगवी येथे एका फ्लॅटमध्ये राहण्यास होत्या. विशाखा यांनी बेडरुममध्ये ओढणीच्या साह्याने पंख्याला गळफास घेतल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले. तसेच त्यांच्या डाव्या हाताची शीर कापली असल्याचेही समोर आले. शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून, गळफासामुळे श्वसनरोध होऊन विशाखा यांचा मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद आहे.
हाताची शीर कापल्याने वाढला संशयविशाखा यांच्या हाताची शीर कापल्याचे उघडकीस आले. शीर कापलेली असताना त्याच हाताने पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास कसा घेतला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच हा गळफास मृत्यूपूर्वी घेतला की मृत्यूनंतर याची उकल होणे आवश्यक आहे. त्यासाठी रक्ताचे डाग आदींबाबत ‘फाॅरेन्सिक लॅब’चा अहवाल मागविण्यात येईल, अशी माहिती कृष्ण प्रकाश यांनी दिली.
पतीचा विरोध?विशाखा सोनकांबळे या योगा प्रशिक्षक होत्या. शहर स्तरावर झालेल्या सौंदर्यवती स्पर्धेत त्यांनी मिसेस पिंपरी-चिंचवड हा बहुमान पटकावला होता. तसेच इतर सामाजिक कार्यातही त्या पुढाकार घेत असत. याला त्यांच्या पतीचा विरोध होता, असे काही लोकांकडून सांगण्यात येत आहे. तसेच अद्याप कोणीही तक्रार देण्यास पुढे आलेले नाही. त्यामुळे सध्या अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे, असे कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.