पुणे : ‘तू अनिकेतचा मर्डर केला आहे ना... बघ मर्डरला मर्डर रिप्लाय देणार’, असे म्हणून गुंडांच्या टोळक्याने दोघांवर धारदार शस्त्राने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
या घटनेत प्रदीप दिनकर देवकर (वय २२, रा. साडेसतरा नळी, हडपसर) व शुभम भोंडे हे गंभीर जखमी झाले आहेत. फिर्यादीवरून पोलिसांनी ओम ऊर्फ पिंटू विनोद भंडारी (वय २१), राजन रघुनाथ लावंड (वय २२, दोघे रा. माळवाडी, हडपसर), ऋषिकेश प्रवीण शितोळे (वय १९, रा. हडपसर) आणि रोशन हनुमंत सोनकांबळे (वय २१, रा. मांजरी) यांना अटक केली आहे. हा प्रकार हडपसरमधील सरकारी ३२ नंबर शाळा येथे बुधवारी पहाटे दीड वाजता घडला.
अधिक माहितीनुसार, २०२० मध्ये अनिकेत शिवाजी घायतडक याचा खून झाला होता. त्यात शुभम भोंडे हा आरोपी असून, तो गेल्या तीन वर्षांपासून तुरुंगात होता. नुकताच तो जामिनावर सुटला आहे. फिर्यादी प्रदीप देवकर हा त्याचा मित्र शुभम भोंडे याच्यासोबत सिगारेट ओढून रिक्षाने घरी जात होते. त्यावेळी आरोपी हे दुचाकीवरून आले. त्यांनी फिर्यादी व शुभम यांना रिक्षातून बाहेर ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ‘तू अनिकेतचा मर्डर केला आहे ना, आता बघ मर्डरला मर्डर रिप्लाय देणार किंवा मला ५ लाख रुपये दे, आज तुला संपवूनच टाकणार’ असे म्हणून दोघांवर धारदार शस्त्राने डोक्यावर, डोळ्यांवर व पाठीवर वार करून ‘कोणी मध्ये आले तर आम्ही कोणालाही सोडणार नाही’, असे बोलून दहशत निर्माण करून दुचाकीवरून पळाले.
पोलिस अंमलदार प्रशांत दुधाळ यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मुंढवा पुलाजवळ सापळा रचून चौघांना पुढच्या चार तासांत पकडले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे, गुन्हे निरीक्षक दिगंबर शिंदे, विश्वास डगळे यांच्या सूचनेनुसार सहायक पोलिस निरीक्षक विजयकुमार शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली.