पिंपरी : धुणीभांडी करणाऱ्या महिलेला घरी येण्यास नेहमीच उशीर होत असे. त्यावरून पती-पत्नीमध्ये वाद होत असत. सोमवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास असाच वाद होऊन त्यात पतीने कोयत्याने वार करून पत्नीचा खून केला. पिंपळेगुरव येथे ही घटना घडली. सांगवी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैला हनुमंत लोखंडे (वय 40) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. हनुमंत बाबुराव लोखंडे वय 58 असे पोलिसांनी अटक केलेल्या पतीचे नाव आहे. शैला या धुणी-भांड्याचे कामे करीत होत्या. कामावरून घरी येण्यास त्यांना नेहमीच उशीर होत असे. त्यावरून शैला आणि पती हनुमंत यांच्यात भांडण होत असे. सोमवारी पहाटे चारच्या सुमारास शैला व हनुमंत यांच्यात भांडण सुरू होते. यावेळी हनुमंत याने शैला यांच्यावर कोयत्याने वार केले. यात शैला यांचा मृत्यू झाला. भांडण सुरू असताना शैला व हनुमंत यांचा आरडाओरडा सुरू होता. तो ऐकून वरच्या मजल्यावरील सावत्र मुलगा खाली आला. त्याने खिडकीची काच फोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी शैला या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. मुलाने त्वरित पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी आरोपी पती याला ताब्यात घेतले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.