पिंपरी : दोघेजण एकत्र दारू पीत असताना एकाकडून दारूचा ग्लास सांडला. त्यामुळे त्याला काठीने व दारुच्या बाटलीने तोंडावर व डोक्यावर मारले. यात त्याचा मृत्यू झाला. त्यांनतर मृतदेह कचऱ्याच्या गाडीत टाकून महाळुंगे गावाजवळ रस्त्याच्या बाजूला टाकला. या प्रकरणातील दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली.
नीलेश सतीश धुमाळ, राजेंद्र थोरात अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मयताची पूर्ण ओळख अद्याप पटलेली नाही. त्याचे नाव बालाजी असून तो नांदेड येथील असल्याचे तपासातून समोर आले आहे. बालाजी हा पिंपरी-चिंचवड परिसरात फिरस्ती होता.
पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जुलै रोजी सायंकाळी माण-महाळुंगे रस्त्याच्या बाजूला कचऱ्यात एक अनोळखी मृतदेह आढळला. त्याची ओळख पटली नव्हती. डोक्यात मारून त्याचा खून केल्याचे शवविच्छेदन अहवालात उघड झाले. त्यात खुनाचा गुन्हा दाखल करून तपासासाठी हिंजवडी पोलिसांची दोन पथके तयार केली. पथकांनी कौशल्याने तपास करून आरोपी निष्पन्न केले.
आरोपी नीलेश आणि मयत हे एकत्र दारू पीत होते. बालाजीकडून नीलेशचा दारूचा ग्लास सांडला. त्या कारणावरून नीलेशने काठीने, दारूच्या बाटलीने तोंडावर, डोक्यावर तसेच शरीराच्या विविध भागात मारहाण करून बालाजीचा खून केला असल्याचे आरोपीने पोलीस तपासात सांगितले.
सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून कचरा टाकणाऱ्या गाडीची ओळख पटवून पोलिसांनी चालक राजेंद्र यालाही अटक केली. कंट्रीबार येथे काम करणारे अखिल आणि धर्मेंद्र या दोघांनी कचऱ्यासोबत बालाजीचा मृतदेह देखील गाडीत भरला असल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पुरावा नष्ट केल्याची कलमवाढ करण्यात आली.
वरिष्ठ पोलीस निरक्षक डाॅ. विवेक मुगळीकर, निरीक्षक सुनील दहिफळे, सोन्याबापू देशमुख, सहायक निरीक्षक सागर काटे, राम गोमारे, उपनिरीक्षक बंडू मारणे, पोलीस कर्मचारी बाळकृष्ण शिंदे, कैलास केंगले, रितेश कोळी, अरुण नरळे, चंद्रकांत गडदे, श्रीकांत चव्हाण, कारभारी पालवे, ओमप्रकाश कांबळे, अमर राणे, दत्ता शिंदे, सुभाष गुरव यांच्या पथकाने ही कामगिरी केली.